‘शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा’, गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. त्यावरुन आता पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
मुंबई : हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. त्यावरुन आता पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना पायातील चप्पल काढायचं शिकवा, असं गुलाबराव पाटील म्हणाले.(Gulabrao Patil criticizes BJP state president Chandrakant Patil)
चंद्रकांत पाटील यांचं योगींना पत्र
‘अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना हिंदू समाजाबाबत अत्यंत अपमानकारक भाषा वापरली आहे. ‘आजचा हिंदू समाज सडला आहे’, अशा वाक्यांचा त्यात समावेश आहे. त्याने समाजात तेढ निर्माण करण्याच्या भावनेतूनच अशा प्रकारची भाषा वारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या संविधानिक संस्थांविरोधातील ही भाषा म्हणजे राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचली आहे’, असं पत्र चंद्रकात पाटील यांनी योगी आदित्यनाथांना पाठवलं आहे.
या पत्रावरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. अशाप्रकारे हिंदूविरोधी वक्तव्य जर कुणी करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल. त्याचा तपासही सुरु करण्यात आला आहे. पण विरोधकांनी हा मुद्दा केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केलाय.
फडणवीसांचा निर्वाणीचा इशारा
‘असा कुठला सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली नाही तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करु,’ असा निर्वाणीचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलाय. एल्गार परिषद ही फक्त आग ओकण्याकरता, समजात तेढ निर्माण करण्यासाठी होते, असं माहिती असूनही परवानगी कशी मिळते. या परिषदेत हिंदूंच्या विरोधात बोललं जात आहे ते सरकारच्या मर्जीनं बोललं जात आहे का? असा सवालही फडणवीसांनी केलाय.
‘मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री चांगले मित्र’
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले मित्र आहेत. त्यांच्या भेटीका कुणी गैर अर्थ घेऊ नये. संबंध दोन्ही ठिकाणी टिकवायचे असतात, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार
‘शिवसेना सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
एल्गारवर राष्ट्रवादीची भूमिका बदलतेय? आव्हाड म्हणतात, त्या वक्तव्याची चौकशी कराच!
Gulabrao Patil criticizes BJP state president Chandrakant Patil