Sanjay Raut : मोदींच्या राफेल विमानापेक्षा वेगवान हा निर्णय, विशेष अधिवेशन बोलवण्याच्या राज्यपालांच्या टीकेवर संजय राऊतांची सडकून टीका
Sanjay Raut : राज्यपालांना अशाप्रकारे अधिवेशन बोलवता येईल का हा प्रश्न आहे. 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर अजून काही निर्णय आला नाही. त्याआधीच राजभवन कामाला लागले आहे.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं पत्रं येताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी तात्काळ एक आदेश काढून राज्य सरकारला विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत. विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करा, असे आदेश राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यासाठी अवघे दोनच दिवस ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सडकून टीका केली आहे. एकतर सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा कोर्टात पेंडिग आहे. जोपर्यंत त्याचा फैसला होत नाही, तोपर्यंत राज्यपालांना अशा प्रकारे बहुमत सिद्ध करण्यास सांगता येत नाही, असं सांगतानाच फडणवीसांच्या पत्रानंतर राजभवन कामाला लागले. त्यांच्या कामाचा वेग पाहता मोदींनी आणलेल्या राफेल विमानापेक्षाही प्रचंड आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते.
राज्यपालांना अशाप्रकारे अधिवेशन बोलवता येईल का हा प्रश्न आहे. 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर अजून काही निर्णय आला नाही. त्याआधीच राजभवन कामाला लागले आहे. या आमदारांवर फैसला येईपर्यंत बहुमत चाचणी करता येत नाही. त्यांच्या प्रवक्त्यांना काही बोलू द्या. पण हे लोक संविधानही जुमानत नसल्याचं दिसून येत आहे. या लोकांनी संविधान अरबी समुद्रात बुडवायला घेतलं आहे, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली.
जेट आणि राफेलपेक्षाही फास्ट
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेला वेळ अपुरा आहे. तो जेटपेक्षाही फास्ट आहे. मोदींनी जी राफेल विमानं आणलीत, त्यापेक्षाही राजभवनातील कार्याचा प्रचंड वेग आहे. अडीच वर्षापासून 12 आमदारांच्या नियुक्तीच्या फायली राजभवनात पडून आहेत. त्यावर निर्णय होत नाही. पण काल एक पत्रं येतं आणि त्यावर तात्काळ निर्णय घेतला जातं. हे आश्चर्य आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हा त्यांचा बालिशपणा
आता असं वाटत असेल तर मी आजपासून बोलण्यास थांबतो. मी शिवसैनिक म्हणून बोलत असतो. माझ्या पक्षाची भूमिका मांडत असतो. कडवट बोलत असतो. माझ्या या बोलण्याचा त्रास होत असेल तर ठिक आहे. तुम्ही मुंबईत या. शिंदे माझे निकटचे मित्रं आहेत. मी काय बोलत आहे. हे त्यांना माहीत आहे. ते काय आहेत मला माहीत आहे. मी किंवा आदित्य ठाकरे बोलत आहेत. म्हणून येत नाही असं म्हणणं हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे आणि आम्ही बोलतं. हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या पक्षाचं कर्तव्य पार पाडत आहोत. त्यासाठी गुवाहाटीत राहून तुमच्या छातीत कळ येण्याचं कारण नाही, असा टोला त्यांनी लगावला.