Anurag Thakur : नव्या राजकीय मित्राबाबत काय म्हणाले केंद्रीय मंत्री, निशाणा मात्र जुन्या मित्रावर..!
मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणूकांमध्ये डबल इंजिन असलेल्या सरकारला साथ देण्याचे आवाहन ठाकूर यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबई : राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे राज्यातील घडामोडीने स्पष्ट झालेच आहे. तरी (Politics) राजकारणातली मैत्री म्हटले की, समोर येते ती (Shiv sena- BJP Party ) शिवसेना-भाजपाची युती. 25 वर्षाच्या युतीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे नवा मित्र म्हणून भाजपाच्या जोडीला शिंदे गट गेला आहे. राजकारणातील या मैत्रीबाबत काय वाटते असा सवाल (Anurag Thakur) केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी दिलेल्या उत्तरातून अनेक अर्थ निघू शकतात. मित्राला मित्रापासून घाबरण्याची गरज नाही असे म्हणत शिंदे गटाला जवळ केले तर जुना मित्र राहिलेल्या शिवसेनेला अधिक अंतर दिले आहे. हा शब्दांचा खेळ असला तरी ठाकूर यांचा निशाणा शिवसेनेवर होता हे आता काही लपून राहिलेले नाही.
‘मिशन लोकसभा’ च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात होते. कल्याण मतदारसंघाचा दौरा आटोपून ते मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते. ठाकूर यांच्यावक कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी होती. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी अंबरनाथ येथे रॅलीही काढली होती.
इंदू मिलमध्ये सुरु असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला उशिर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याला उत्तर देताना त्यांनी मोदी सरकारचे योगदान निदर्शनास आणून दिले आहे. स्मारकाचे जे काही काम होत आहे ते मोदी सरकारनेच केले असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर 14 एप्रिलला सुट्टीचा निर्णय देखील मोदी सरकारच्या काळात झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण आणि ठाणे मतदार संघात शिंदे गटाचे खासदार असले तरी भाजपाने या मतदार संघात तयारी सुरु केली आहे. मात्र, आम्ही एकच असल्याचे म्हणत ठाकूर यांनी त्या प्रश्नावर सावरासावर केली. तर खा. श्रीकांत शिंदे यांना तर आपण भेटलो आहोतच पण राहुल शेवाळे यांना देखील भेटणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आम्ही सोबत येऊन जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणूकांमध्ये डबल इंजिन असलेल्या सरकारला साथ देण्याचे आवाहन ठाकूर यांनी मुंबईकरांना केले आहे. त्यामुळे मिशन लोकसभा बरोबरच ठाकूर यांनी मुंबई महापालिकेसाठीही दौरा असल्याचे दाखवून दिले आहे.