Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…
Narendra Modi meets Uddhav Thackeray & Sharad Pawar : नरेंद्र मोदी नेमके कुठे जात आहेत, त्याचे हावभाव कसे आहेत, याकडे जावेद अख्तर यांची बारीक नजर होती. संपूर्ण व्हिडीओमध्ये जावेद अख्तर हे नरेंद्र मोदी यांना बारीकपणे न्याहाळताना दिसले.
मुंबई : लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कात (Shivaji Park) शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लता मंगेशकर यांचं अखेरचं दर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मुंबईत आले होते. संपूर्ण सुरक्षेसह मोदींचा ताफा हा मुंबई विमानतळावरुन वरळी सी-लिंक मार्के दादरच्या शिवाजी पार्कात पोहोचला. यावेळी आधीच शिवाजी पार्कात दाखल झालेल्या राजकीय नेते मंडळींचीही मोदींनी भेट घेतली. अंत्यसंस्कारासाठी आधीच शिवतीर्थावर पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी हात जोडून नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी औपचारीक भेट घेतली. त्यानंतर मोदी हे लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या दिशेने निघाले. मध्ये एके ठिकाणी थांबून ते एका खुर्चीवर बसतील की काय, असं वाटलं खरं. पण काही क्षण ते स्तब्ध राहिले. यानंतर ते बाजूलाच असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Uddhav Thackeray & Sharad Pawar) यांच्या दिशेनं पुढे निघाले.
जावेद अख्तर यांची बारीक नजर…
यावेळी नरेंद्र मोदी नेमके कुठे जात आहेत, त्याचे हावभाव कसे आहेत, याकडे जावेद अख्तर यांची बारीक नजर होती. संपूर्ण व्हिडीओमध्ये जावेद अख्तर हे नरेंद्र मोदी यांना बारीकपणे न्याहाळताना दिसले. दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या दिशेने मोदी जात आहेत, हे पाहून मोदींचे सुरक्षारक्षकही त्या दिशेनं चालू लागले.
बघा, त्या काही मिनिटांच्या भेटीत काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दिशेनं येत आहेत, हे पाहून शरद पवारांच्या शेजारी बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उठले. सोबतच शरद पवारही उठले. महाराष्ट्राच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांना नरेंद्र मोदी यांनी हात जोडून नमस्कार केला. याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हात जोडून नमस्कार करत प्रतिसाद दिला. अवघ्या काही क्षणांच्या या भेटीमध्ये एक अक्षरही संवाद झाला नाही. मात्र शरद पवार हे एका हातानं उद्धव ठाकरे यांना काहीतरी खुणावताना व्हिडीओमध्ये दिसले.
पवारांना ठाकरेंच्या बाजूला बघून…
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या निमित्तानं समोर आलेले हे तीन महत्त्वाचे नेते, त्यांनी एकमेकांना केलेला नमस्कार, अप्रत्यक्ष भेट, याचे अनेक राजकीय अर्थ आहेत. या भेटी दरम्यानची नरेंद्र मोदींची देहबोली, उद्धव ठकरे आणि शरद पवार यांची देहबोली, याचेही अनेक अर्थ, तर्क वितर्क काढले जात आहेत.
एकेकाळी राजकीय मित्र असलेला पक्ष, एकेकाळची युती, तेव्हाचं नात आणि आता शरद पवारांच्या शेजारी उद्धव ठाकरेंची असलेली जवळीक हे सगळं पाहून नरेंद्र मोदी यांच्या मनात नेमकं काय आलं असेल? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला नाही, तरच नवल!
संबंधित बातम्या :
मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?
रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामागचा नेमका संदर्भ काय?