खेड पंचायत समितीचा नेमका वाद काय? संजय राऊत पहिल्यांदाच महाविकास आघाडीविरोधात का बोलले?
विशेष म्हणजे शिवसेनेचे चाणक्य समजले जाणाऱ्या संजय राऊतांना पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षांना या प्रकारावरून तंबी द्यावी लागलीय. Sanjay Raut Khed Panchayat Samiti
पुणेः खेड पंचायत समितीचे (Khed Panchayat Samiti) शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचंही चित्र निर्माण झालंय. विशेष म्हणजे शिवसेनेचे चाणक्य समजले जाणाऱ्या संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षांना या प्रकारावरून तंबी द्यावी लागलीय. (What exactly is the dispute of Khed Panchayat Samiti? Why did Sanjay Raut speak against Mahavikas Aghadi for the first time?)
खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झालीय. पंचायत समितीच्या जागेवरून हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करू नका, शिवसेना उत्तर देईल. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीने पळवून नेलं, जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील, असंही संजय राऊत यांनी अधोरेखित केलंय.
पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय
हा विषय त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे. पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं के पाहू. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येतील, अशा इशाराचं संजय राऊतांनी दिलाय.
नेमकं काय आहे प्रकरण?
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केलेय. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला 9 महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झालीय. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आलेय. सर्व पक्षीय 14 पैकी 11 सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातंय. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संबंधित बातम्या