Explainer | या कारणामुळे छत्रपती शाहू महाराज यांना झाला कोल्हापूरमधून विरोध?
संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला खो बसलाय. मात्र ज्यांचे नाव पुढे आल्याने ही राजकीय परिस्थिती ओढवली आहे ते छत्रपती शाहू महाराज यांना कधी काळी कोल्हापूरकरांनी विरोध केला होता हे ही सत्य आहे.
कोल्हापूर | 7 फेब्रुवारी 2024 : कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर संधी देऊन कोल्हापूर हे पुरोगामीच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होताना दिसतोय. त्यामुळेच शाहू महाराज यांच्या नावाचा आग्रह केला जातोय. मात्र, यावरून छत्रपती घराण्यात राजकीय संभ्रम उद्भवला आहे. संभाजीराजे छत्रपती संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. सध्या ते घरातील काही लोक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशीच बोलत असल्याचं सांगितलं जातंय. छत्रपती घराण्यातील हा राजकीय संभ्रम संपल्यानंतरच ते समोर येण्याची शक्यता आहे.
संभाजी राजे संपर्क क्षेत्रात कधी येणार याची उत्सुकता कोल्हापूरकरांबरोबरच सर्वच पक्षातील राज्यातल्या नेत्यांना लागली आहे. त्यासाठी त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून गळ घातली जात आहे. परंतु, यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला खो बसलाय. मात्र, ज्यांचे नाव पुढे आल्याने ही राजकीय परिस्थिती ओढवली आहे ते छत्रपती शाहू महाराज यांना कधी काळी कोल्हापूरकरांनी विरोध केला होत हे ही सत्य आहे.
कोण आहेत शाहू महाराज छत्रपती?
शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. इंग्रजांनी संस्थाने खालसा केली. त्यामुळे कोल्हापुरात करवीर अधिपती अशी त्यांची ओळख आहे. शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी २८ जून १९६२ रोजी नागपूरकर भोसले घराण्यातील राजरामसिंह आणि शालिनीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीपसिंह यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले.
कोल्हापुरमध्ये शाहू महाराज यांचे हे दत्तक प्रकरण खूपच गाजलं होतं. शाहू महाराज यांना दत्तक घेण्यास करवीरकरांचा विरोध होता. त्यासाठी अनेक आंदोलने देखील झाली. 1970 च्या दरम्यान महाराज दत्तक वारसदार म्हणून आले. शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984 ला शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरच्या गादीवर आले.
दत्तक प्रकरणावरून झालेल्या वादामुळे ते कधीही सार्वजनिक जीवनात फार आले नाहीत. मात्र, 1995 ला युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यावेळी शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी शिवसेनेमध्ये गेले होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील शाहू महाराज छत्रपती यांच्याशी जवळीक आहे. 1999 ला राष्ट्रवादीमधून शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह शरद पवार यांनी केला होता. पण, शाहू महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर शाहू महाराज छत्रपती कधीही कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत. परंतु, कोल्हापूरच्या जनतेसह सर्व राजकीय पक्ष संघटनांकडून त्यांचा तितकाच आदर केला जातो हे ही तितकेच खरे आहे.