शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ‘ती’ गोष्ट खुपते; नितीन गडकरी यांची पहिल्यांदाच मन की बात
या देशात विचारभिन्नता हा प्रॉब्लेम नाही. विचारशून्यता हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाच्या विचाराचे असाल. कम्युनिस्ट असाल समाजवादी विचाराचे असाल. पण तुम्ही तुमच्या विचाराशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरत आहेत. या दोन्ही नेत्यांचं एक वैशिष्ट्ये म्हणजे दोघांच्याही मनाचा थांगपत्ता लागत नाहीत. दोघांच्याही पक्षात फूट पडली आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या पक्षात ज्यांनी बंड केलं त्यांनी 40 आमदार मूळ पक्षातून फोडले आहेत. दोन्ही पक्षातील बंडखोरांनी दोन्ही नेत्यांवर सेम आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आसपासचे लोक आम्हाला त्यांना भेटू देत नसल्याचा आरोप दोन्ही गटाच्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे.
नितीन गडकरी हे अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमाचा प्रोमोही रिलीज झाला आहे. गुप्ते यांनी घेतलेली नितीन गडकरी यांची मुलाखत आज दाखवण्यात येणार आहे. यावेळी अवधूत गुप्ते यांनी नितीन गडकरी यांना काही नेत्यांचे फोटो दाखवून तुम्हाला या नेत्यांच्या कोणत्या गोष्टी खुपतात ते सांगा असा सवाल केला.
यावेळी गडकरी यांना पहिला फोटो उद्धव ठाकरे यांचा दाखवण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांना फोन केला तर ते फोनवर फार कमी येतात, असं नितीन गडकरी म्हणाले. त्यानंतर त्यांना शरद पवार यांचा फोटो दाखवून त्यांची खुपणारी गोष्ट विचारण्यात आली. त्यावरही गडकरी यांनी मजेदार उत्तर दिलं. शरद पवार साहेब स्पष्ट कधीच बोलत नाहीत, असं गडकरी यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
रस्ते कशाला बनवले?
नितीन गडकरी आणि रस्ते तसेच पूल हे समीकरण घट्ट आहे. गडकरी यांची ओळखच पुलकरी अशी झालेली आहे. चांगले आणि दर्जेदार रस्ते बनवण्यात गडकरी यांचा हातखंडा असल्याचंही सर्वश्रूत आहे. पण एका अधिकाऱ्याला गडकरी यांचं हे काम कसं खटकलं होतं, याचा किस्साच त्यांनी एकवला. मला एकदा एक सरकारी अधिकारी भेटले.
मला म्हटले, गडकरी अपघातांना तुम्हीच जबाबदार आहात. मी म्हटलं, मी कसा काय जबाबदार आहे? त्यावर ते म्हणाले, तुम्ही रस्ते का चांगले केले? म्हटलं, मी काय करू? ते म्हणाले, तुम्ही रस्ते चांगले केले म्हणून अपघात होतात. त्यामुळे तुम्ही रस्ते चांगले करण्याच्या भानगडीत पडू नका. मी म्हटलं मग असं करतो आहे ते रस्तेही खोदून काढतो, गडकरी यांनी हा किस्सा सांगताच पुन्हा हशा पिकला.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होतात. मुख्यमंत्रीपद तुमच्याकडेच येणार असं वाटत असताना तुम्ही दिल्लीत गेला? असं काय झालं? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. मी महाराष्ट्र भाजपचा अध्यक्ष होतो. मला दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. पण परिस्थिती अशी झाली की मला दिल्लीत जावं लागलं. त्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. दिल्लीत गेल्यावर मग ठरवलं पुन्हा महाराष्ट्रात जायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मीडियाच जबाबदार
महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील. पण मनभेद नव्हते. मी 18 वर्ष विधीमंडळात होतो. कठोर टीका करायचो. पण व्यक्तिगत मैत्री होती. आता थोडसं अति झाल्यासारखं वाटतं. सर्वसामान्य माणसाला त्याचा कंटाळा आलाय. याला खरं कारण नेत्यांपेक्षा मीडियाच आहे, असंही ते म्हणाले.
तेव्हा राजकारण बदलून जाईल
मुलीला नवरा बघताना तुम्ही किती विचार करता. मुलगा काय करतो? त्याचे आईवडील कसे आहेत? त्यांचं घर कसं आहे? मग मत देताना गंभीर विचार का करत नाही? माझ्या जातीचा म्हणून मतं देता, भाषेचा आहे म्हणून मतं देता. ज्या दिवशी जनता ठरवेल आम्ही विचारपूर्वक मत देऊ, चुकीच्या माणसाला मत देणार नाही, तेव्हा राजकारण आपोआप बदलून जाईल, असंही ते म्हणाले.
बाळासाहेबांची इच्छा
बाळासाहेब ठाकरे यांची राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. त्यांनी पुढाकार घेतला होता. पण त्यात त्यांना यश आलं नाही. लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना बाळासाहेबांनी मलाही या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यास सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.