शरद पवार जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा, शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर : प्रताप सरनाईक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
ठाणे : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे पवारांनी राम मंदिराबाबत केलेलं वक्तव्य हे सरकार एकत्र आल्यामुळे केलंय, असं नाही. भाजपने वाटोळं केलंय. आता राम मंदिरावरुन राजकारण करु नये”, असं आवाहन शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं. (Pratap Sarnaik on Sharad Pawar)
नुकतंच शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असा टोला लगावत पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला सोलापूर दौऱ्यात दिला होता. (Pratap Sarnaik on Sharad Pawar)
त्यावरुन भाजपने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करुन, आता उद्धव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी पवारांच्या NOC ची गरज लागणार का असा सवाल विचारला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपवर पलटवार केला.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
“राम मंदिराबाबत कोणीही राजकारण करु नये. भाजपने वाटोळ केलं. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्यांवर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा जगजाहीर आहे. आमच्या पक्षाच्या भूमिकेबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करु नये”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. त्यांनी तो स्वीकारला आहे, त्यांनी ते विधान केले आहे, ते सरकार एकत्र आल्यामुळे नाही. रामजन्म भूमिपूजनावरुन कोणीही राजकारण करु नये, असं प्रताप सरनाईकांनी नमूद केलं.
राम मंदिर मुद्दा हा देशात नसून जगात गाजत आहे. राम मंदिरबाबत एकच वाघ (बाळासाहेब ठाकरे) मागणी करत होता हे सर्वांना माहिती आहे. गेले 28 वर्ष आंदोलन चालू होते. आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. 5 ऑगस्ट ही तारीख भूमिपूजनासाठी निश्चित केली आहे. यामध्ये शिवसेनेचं मोठं योगदान आहे. राम मंदिरासाठी 1 कोटीचा निधीही शिवसेनेकडून दिला आहे, अशी आठवण प्रताप सरनाईकांनी सांगितली.
प्रताप सरनाईकांचं पत्र
प्रताप सरनाईक यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांना पत्र लिहून “कोणतंही राजकारण न करता शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रित करा, असं म्हटलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राम मंदिर लढ्यात शिवसेनना अग्रस्थानी असल्याची आठवण ट्रस्टला करुन दिली.
(Pratap Sarnaik on Sharad Pawar)
संबंधित बातम्या
शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर ‘त्या’ अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार