ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!
ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्याचा दावा न्यायालयात महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. दरम्यान लटके यांच्याविरोधात नेमकी तक्रार कोणी दाखल केली हे आता समोर आलं आहे.
मुंबई : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांचा राजीनामा महापालिकेने स्विकारण्यास नकार दिला. याविरोधात ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली. ऋतुजा लटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिकेला (BMC) दणका देत लटके यांचा राजीनामा आज सकाळी 11 पर्यंत स्विकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दुसरीकडे याच सुनावणीदरम्यान ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आहे, असा दावा महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.
तक्रारदाराला कोणीच ओळखत नसल्याचा दावा
ऋतुजा लटके यांच्याविरोधात नेमकी तक्रार कोणी दाखल केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न टीव्ही 9 मराठीने केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात रमलू चिन्नय्या नावानं तक्रार दाखल झाली होती. या तक्रार अर्जावर अंधेरीमधील एका चाळीचा पत्ता देण्यात आला होता. याबाबत स्थानिकांशी चर्चा केली असता रामलू चिन्नय्या या व्यक्तीला तिथे कोणही ओळखत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.