मुंबई | 23 जुलै 2023 : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतर त्यांचा एक गट राज्यातील सत्तेत सहभागी झाला. अजित पवार भाजपसोबत गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवार गट ईडीच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचं आधी सांगितलं जात होतं. पण अजित पवार यांच्या पहिल्या भाषणानंतर शरद पवार यांची धरसोड वृत्ती आणि पवार निवृत्त होत नसल्यामुळेच अजित पवार यांना वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचं ध्वनित झालं. त्यामुळे त्यानुषंगाने तर्कवितर्क लढवले गेले. मात्र, आता अजितदादा यांच्या फुटीमागचं वेगळं कारण समोर आलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून नवा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत हे गेल्या आठवड्यात बंगळुरूला निघाले होते. विरोधी पक्षाची दिल्लीत बैठक होती. त्यासाठी ते निघाले होते. या बैठकीला जात असताना मुंबईतील एका हॉटेलात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या एका बड्या नेत्यासोबत त्यांची भेट झाली.
हा नेता एनडीएच्या बैठकीला जात होता. त्यावेळी या नेत्याचा आणि संजय राऊत यांचा संवाद झाला. त्यावेळी या नेत्याने भाजपसोबत जाण्याबाबतची त्यांच्या गटाची हतबलता व्यक्त केली. संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये हा संवाद जशाच्या तसा दिला आहे. राऊत यांनी या नेत्याचं नाव सांगितलं नाही. त्यामुळे हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे. एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीकडून फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोनच नेते उपस्थित होते. त्यामुळे राऊत यांना काय सूचवायचं आहे? असा सवाल आता केला जात आहे.
मी सांगितले, ‘आम्ही बंगळुरात निघालोय.’ यावर त्यांचा प्रश्न, ‘तेथे जाऊन आता काय साध्य होणार?’
‘काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात,’ असे मी म्हटले. त्यावर ते म्हणाले, ‘विरोधी पक्षांचे ऐक्य आता कशासाठी?’
‘मोदी-शहांचा पराभव करण्यासाठी!’
‘मोदीचा पराभव का करायचा?’ प्रश्न.
‘देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी. आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता आणि संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय?’ माझा प्रश्न.
‘चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.’ असे ते म्हणाले.
‘2024 ला मोदी जातील. तेव्हा काय कराल?’
‘ते खरेच जातील काय?’
‘जातील हे नक्की!’ मी ठामपणे सांगितले. त्यांच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
आम्हीच जिंकणार!
यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. बंगळुरूत सर्व विरोधक एकत्र आले. देशप्रेमी पक्ष एकवटले आणि आमच्या आघाडीला आम्ही इंडिया हे नाव दिलं. बंगळुरूत 24 पक्ष एकवटल्यानंतर भाजपने दिल्लीत बैठक घेऊन एनडीएचा जीर्णोद्धार केला, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. भाजपने एनडीएत 38 पक्ष असल्याचा दावा केला आहे. या 38 पक्षांपैकी 26 पक्षांचे त्या त्या राज्यात अस्तित्वही नाही. काही पक्ष तर फक्त तालुक्यांपर्यंतच मर्यादित आहेत. विनय कोरे, बच्चू कडू आणि गोव्यातील सरदेसाई हे त्यापैकी एक. या 26 पक्षांचा एकही खासदार नाही. पण 38 पक्ष सोबत असल्याचा फुगा फुगवण्यात आला आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.