Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : शब्द टाकला असता तर कोणी नाही म्हटलं नसतं, पण मी त्यात पडलो नाही; शरद पवारांनी अंग काढून का घेतलं?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोटा ठरलेला होता. त्या कोट्याप्रमाणेच आम्हाला मते मिळाली आहेत. त्यात कुठेही फरक पडलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक अतिरिक्त मत मिळालं आहे. ते आमचं मत नाही.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पवारांनी या निवडणुकीचं अचूक विश्लेषण करताना सूचक इशाराही दिला आहे. तसेच भविष्यात काय घडू शकते, याचे संकेतही दिले आहेत. या निकालाने आपल्याला धक्का बसला नाही, असं पवार म्हणाले. पण भाजपमध्ये (bjp) माझ्यासोबत काम केलेले अनेक लोक आहेत. त्यांना मी शब्द टाकला असता तर त्यांनी नाही म्हटलं नसतं. पण मी त्यात पडलो नाही, असं शरद पवार म्हणाले. पवारांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पवार इथून पुढे सक्रिया होणार का? राज्यसभेतील पराभवाचे विधान परिषदेत पवार उट्टे काढणार का? आमदार फुटणं काय असतात हे पवार भाजपला दाखवणार का? असे प्रश्न उपस्थित होत असून मग असं असताना शरद पवारांनी या अंग काढून का घेतलं? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतं आहे.
पवार नेमकं काय म्हणाले?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोटा ठरलेला होता. त्या कोट्याप्रमाणेच आम्हाला मते मिळाली आहेत. त्यात कुठेही फरक पडलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक अतिरिक्त मत मिळालं आहे. ते आमचं मत नाही. आम्हाला मिळालेलं अतिरिक्त मत शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते अतिरिक्त मत विरोधकांच्या कोट्यातील होतं. त्यांनी मला सांगून दिलं होतं. भाजपमध्ये अनेक लोक आहेत. त्यांनी कधीकाळी माझ्यासोबत काम केलंय. मी जर एखादा शब्द टाकला तर त्यांनी नाही म्हटलं नसतं. पण मी त्यात पडलो नाही. मी राष्ट्रवादीला मतदान करणार आहे हे एकाने स्वत:हून मला सांगितलं. तेच मत आम्हाला मिळालं. पण ते मत भाजपचं नव्हतं. भाजप सोबत असलेल्या अपक्षाचं मत फुटलं, असंही ते म्हणाले.
मग पवारांनी अंग काढून का घेतलं?
मी जर शब्द टाकला असता तर भाजपकडील मते आपल्याकडे आली असती असं पवारांनी सांगितलं. मग पवारांनी शब्द का टाकला नाही? त्यांनी अंग का काढून घेतलं असा सवाल केला जात आहे, असा सवाल केला जात आहे. त्याचं उत्तरही पवारांनीच दिलं आहे. आघाडीकडे ठरलेला कोटा होता. त्यांची मते फुटण्याची शक्यता नव्हती. शिवाय 17 अपक्ष आमदार आघाडीसोबत होते. एमआयएमनेही पाठिंबा दिला होता. तसेच खुद्द शरद पवारांनी बविआचे नेते हिंतेद्र ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. आपल्याकडचीच मते पुरेशी आहेत. भाजपची मते फोडण्याची गरज नाही, अशी आघाडीची समजूत झाली होती. त्यामुळे पवारांनी फोडाफोडीच्या राजकारणात रस दाखवला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.