Eknath Shinde: उद्धव ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंची थेट टीका, ठाण्यात अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन, नाराजीची 5 कारणे सांगितली
Eknath Shinde: श्रीकांत शिंदे यानी आपल्या भाषणातून आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना निधीच मिळत नव्हता. त्यामुळे मतदारसंघाची कामे कशी करायची? असा प्रश्न आमदारांना पडला होता.
ठाणे: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यांच्यासोबत 50 आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या बंडाला आज पाच दिवस होत आहेत. या पाच दिवसात फक्त एकनाथ शिंदेंच पिक्चरमध्ये होते. त्यांचे चिरंजीव आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे कुठेच दिसले नव्हते. श्रीकांत शिंदे मीडियासमोर आले नाहीत आणि त्यांनी ट्विटही केलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच आज श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना (shivsena) नेते नरेश म्हस्के यांनी ठाण्यात प्रचंड रॅली काढली. यावेळी एकनाथ शिंदे आगे बढोच्या घोषणांनी ठाणेकरांनी संपूर्ण ठाणे दणाणून सोडले. शिंदे समर्थक या रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. तसेच शिंदे आणि आमदारांच्या नाराजीची पाच कारणंही सांगितली.
राष्ट्रवादीमुळे निधी मिळत नव्हता
श्रीकांत शिंदे यानी आपल्या भाषणातून आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना निधीच मिळत नव्हता. त्यामुळे मतदारसंघाची कामे कशी करायची? असा प्रश्न आमदारांना पडला होता. उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थात होती, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.
भेटही नाही, ऐकणारंही नाही
राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. काही नेत्यांनी पक्षप्रमुखांच्या कानावर ही गोष्ट घातली. आमदार नाराज असल्याचं सांगितलं. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. इतर आमदारांना तर मुख्यमंत्र्यांची भेटही घडत नव्हती. त्यांना तिथंपर्यंत पोहोचू दिलं नाही. आपलाच मुख्यमंत्री भेटत नसल्याची ही सल आमदारांच्या मनात होती. त्यामुळे आमदारांना एकच आधार हा शिंदे साहेबांचा होता, असं ते म्हणाले.
कोरोना काळात शिंदे एकटेच फिरायचे
कोरोनाच्या संकटात शिवसेनेतून फक्त एकनाथ शिंदे एकटे फिरत होते. पायाला भिंगरी लावून ते फिरत होते. ते घरात बसून राहिले नाहीत. जीवाची पर्वा न करता अहोरात्र फिरत होते. या काळात त्यांना दोनदा कोरोना झाला. पण त्यांनी लोकांना मदत करणं थांबवलं नाही. बंड्या साळवींना कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांना धीर देण्यासाठी एकनाथ शिंदे हे पीपीई कीट घालून रुग्णालयात गेले होते, अशी आठवण सांगतानाच शिंदे कुटुंबाचं घर लोकांसाठी 24 तास खुलं होतं, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
शिवसैनिकांचा ऊसही घेतला जात नाही
पहिलं शिवसंपर्क अभियान झालं. आमची बैठक झाली. सर्व खासदारांकडून लेखी अभिप्राय मागवला. त्यावेळी आम्ही सांगितलं साहेब, कार्यकर्त्यांचा जीव या आघाडीत घुसमटत आहे. त्यांचं कोणतंही काम या आघाडीत होत नाही. त्यासाठी काही तरी करा. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्या. पुन्हा आम्हाला दुसऱ्या मोहिमेला गेलो. साताऱ्यात गेलो. तिथे कारखाने आहेत. तिथे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शिवसैनिकांचा ऊस घेताना तू कोणत्या पक्षाचा आहे हे विचारलं जातं. नंतर त्याचा ऊस घेतात. पण सर्वात शेवटी. नंबर लागला तर ऊस घेतात. नाही तर शेतकऱ्याला ऊस जाळावा लागतो, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही सर्वांना निधी दिला, पण
इतिहासात जेवढा झाला नाही, तेवढा असंतोष गेल्या अडीच वर्षात शिवसेनेत वाढला. त्याचा विचार केला पाहिजे होता. शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आपण कधी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची गळचेपी केली नाही. माझ्या मतदारसंघात नगरविकास विभागाचा निधी मिळत होता. तेव्हा सर्व पक्षाच्या नगरसेवकांनाही आपण निधी दिला. ही असते आघाडी. हा असतो आघाडीचा धर्म असं त्यांनी सांगितलं.