धर्मांतरीत व्यक्तींना आदिवासींचे लाभ मिळणार का?, समिती स्थापन; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
आदिवासींना विविध प्रलोभनं दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणी धर्मांतर करणारे दोन्ही प्रकाराच्या सवलतीचा लाभ पदरात पाडून घेतल असल्याची लक्षवेधी सूचना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवर कौशल्य आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना या प्रकरणी धर्मांतरीत व्यक्तींना आदिवासींचे लाभ घेता येतील का याविषयी समिती नेमून अभ्यास केला जाईल असे म्हटले आहे.
नागपूर | 14 डिसेंबर 2023 : आदिवासी समाजातील व्यक्तीने धर्मांतर इतर धर्म स्वीकारला असेल तर त्यांना आदिवासी आणि अल्पसंख्यांक अशा दोन्ही समाजाचे लाभ मिळत असल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला आहे. आदिवासी समाजातील व्यक्तीने इतर धर्म स्वीकारला असेल तर त्याला आदिवासी समाजाचे लाभ मिळू नयेत अशी लक्षवेधी सूचना भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली होती. यावर धर्मांतरीत व्यक्तीला आदिवासी समाजाचे लाभ द्यावेत की नाही यावर निवृत्त कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभ्यास केला जाईल असे स्पष्टीकरण कौशल्य आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केले आहे.
आदिवासी विभागात धर्मांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आदिवासींना व्यक्तीला त्यांच्या धर्माचा त्याग करुन ईसाई किंवा इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे असे भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी सांगितले. तर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकार धर्मांतर विरोधी कायदा करणार का ? अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. हल्ली धर्मांतर करुन सवलती घेतल्या जात आहेत त्यामुळे धर्मांतर बंदी कायदा करणार आहे का ? असा सवाल पडळकर यांनी सरकारला केला.
जबदस्तीने धर्मांतरावर कायदा
यावर उत्तर देताना जबरदस्तीने धर्मांतर करण्यावर बंदी आणण्यासाठी केंद्र निर्णय घेत आहे. धर्मांतरीत व्यक्ती अल्पसंख्याकाचे लाभ घेतो आणि दुसरीकडे आदिवासी समाजाचेही लाभ घेतोय. जे विद्यार्थी दोन्ही लाभ घेत आहेत. त्यांची माहीती घेणे गरजेचे आहे. हा केवळ धर्मांतराचा विषय नसून आदिवासींच्या अस्मितेचा देखील विषय असल्याचे मंत्री मंगलप्रभात यांनी उत्तर देताना सांगितले. यावर्षी आयटीआयमध्ये 11710 अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी धर्मांतर करून बौद्ध धर्मात गेलेल्या 3, मुस्लिम धर्मात गेलेल्या 17 विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
कपिल पाटील यांनी घेतली हरकत
यावेळी आमदार कपिल पाटील यांनी हरकत घेत सरकारने धर्माधारित लेखी उत्तर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. राजकीय सभेत तुम्ही अशी भाषण करा. परंतू सभागृहात तुम्ही धर्मावर आधारित भाषण करु शकत नाहीत. धर्मावर आधारित भेदभाव येथे करता येणार नाही. हे सरकार धर्मावर आधारित भेदभाव करते. उत्तर देताना सरकारने धर्मावर आधारित प्रशिक्षणार्थ्यांची संख्या दिली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.संविधानाचे उल्लंघन आहे. धर्माधारित आकडेवारी देणे चुकीचे आहे. आदिवासीला धर्म नसतो, तो एक समाज आहे. यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही आकडेवारी मी दिलेली नाही. आदिवासी विभागाकडून आलेली ही माहीती असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.