आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या, मग माझ्याकडे मागा, यशोमती ठाकूर यांचा पलटवार
चंद्रकांत पाटील यांचं आंदोलन केविलवाणं असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.
अमरावती : भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, नंतरच मला राजीनामा मागा, असा पलटवार महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. (Yashomati Thakur challenges BJP to take Amit Shah’s resignation first)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलन करत यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली. मात्र चंद्रकांत पाटील यांचं आंदोलन केविलवाणं असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.
माझ्यावर लावलेले गुन्हे हे राजकीय आकसापोटी आहेत. मात्र कलम 420, 307, 302 अंतर्गत गुन्हे असलेले भाजपचे नेते मोकळे फिरत आहेत. त्यामुळे आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागावा, नंतरच माझा राजीनामा घ्यावा. भाजपला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असा पलटवार ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यानेच ते यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेत नाहीत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.
यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप आंदोलन करत राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. येत्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा मिळाला आहे. यशोमती ठाकूर यांची शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. आठ वर्ष जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. (Yashomati Thakur challenges BJP to take Amit Shah’s resignation first)
अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यशोमती ठाकूर यांना 15 ऑक्टोबरला तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला.
संबंधित बातम्या :
मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा, पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी तीन महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती
मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी
(Yashomati Thakur challenges BJP to take Amit Shah’s resignation first)