सुप्रिया सुळेंनी पक्ष फोडल्याचा दावा केला; बावनकुळेंनी स्वभाव अन् संस्कारांचा दाखला दिला!, वाचा नेमकं काय घडलं…
Chandrashekhar Bawankule on Supriya Sule Statement : आपलं घर फुटलं ते वाचवू शकला नाहीत आणि आता...; सुप्रिया सुळे यांच्या दाव्याला भाजपचं प्रत्युत्तर. सुप्रिया सुळेंनी भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याच दावा केला. बावनकुळे म्हणाले...
यवतमाळ | 24 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत बोलताना भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमचा तो स्वभाव नाही. आमचे ते संस्कार नाहीत. असे फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत? हे देशाला माहिती आहेत. महाराष्ट्रालाही ते माहिती आहे. त्यांना ते लखलाभ!, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
इतरांचे पक्ष फोडण्याचं काही लोकांनी जीवनभर राजकारण केलं. आता तेच लोक आमच्यावर बोलत आहेत. खरंतर सुप्रिया सुळे या ताई आहेत. आमच्या आदरणीय आहेत. पण स्वातंत्र्यानंतर इतिहास पाहा. काय-काय झालं ते. पक्ष फोडून कुणी सत्ता मिळवली, असंही बावनकुळे म्हणालेत.
एकनाथ शिंदे मर्द मराठा नेता आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली. इकडे अजित पवार यांनी देशाच्या राष्ट्राच्या कल्याण आत्मनिर्भर भारतासाठी मोदींना साथ दिली आहे. पवारांचं घर फुटलं. त्याचं घर ते सांभाळू शकले नाहीत. म्हणून सुप्रिया सुळे असे आरोप करत आहेत. पण मला विश्वास आहे. पुढच्या काळात शरद पवार आपलं मन परिवर्तन करतील आणि मोदींना समर्थन देतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्र्वादी पक्ष फोडण्याचा भाजपचा हा पहिलाच प्रयत्न नाही. तर याआधीही त्यांनी तीन वेळा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला त्यांना यश आलं नाही. पण तिसऱ्यावेळी त्यांना यश आलं, असं सुप्रिया सुळे यांनी एका इंग्रजी वृत्तपक्षाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. चंद्रशखर बावनकुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे 105 कष्ट घेऊन निवडून आले. भाजपच्या आमदारांबद्दल मला वाईट वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यावरही बावनकुळे यांनी भाष्य केलंय. भाजप आमदारांना काहीही वाईट वाटत नाही. उलट सुप्रिया सुळे या स्वत:चं दुःख व्यक्त करत आहेत. शेवटी अजितदादांनीही देशाहितासाठी भूमिका घेतली. देशहितासाठी काहीही असं मानणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपचा नेता-कार्यकर्ता नाराज नाही, असं बावनकुळे म्हणाले.