पुण्यात संपूर्ण पिरंगुट गावच क्वारंटाईन, पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी
मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावातील 36 वर्षीय महिलेमध्ये 'कोरोना'ची लक्षणे आढळली आहेत, त्यामुळे संपूर्ण गावच क्वारंटाईन करण्यात आले आहे (Pune Pirangut Village Corona Quarantine)
पुणे : पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुण्यातील संपूर्ण पिरंगुट गावच क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात घबराटीचं वातावरण पसरलं आहे, मात्र खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. (Pune Pirangut Village Corona Quarantine)
मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावातील नागरिक आणि प्रशासनही अलर्ट मोडवर आहेत. पिरंगुटमधील 36 वर्षीय महिलेमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे आढळली आहेत.
पिरंगुट गाव क्वारंटाईन करुन गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. गावांमध्ये निर्जंतुक फवारणी सुरु करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने पिरंगुट गावामधील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला जात आहे.
पुण्यात आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त महिलेचा मृत्यू
पुण्यात आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त महिलेला प्राण गमवावे लागले आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज मिळाला होता, परंतु पुन्हा प्रकृती ढासळल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या तीनवर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 33 ‘कोरोना’बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय झालं?
संबंधित 60 वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. काल तिला ससून रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.
VIDEO : वरळीतील हार्ट पेशंटच्या मदतीला मंत्री आदित्य ठाकरे धावून आलेhttps://t.co/IAhPMlQdaV #CoronaInMaharashtra @AUThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2020
पुणेकरांची धाकधूक वाढली
पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी एकूण वीस नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात 9, तर पिंपरीत सहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 83 वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 23 ने रुग्णांची संख्या वाढली, तर पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे. (Pune Pirangut Village Corona Quarantine)