AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग भीमाशंकर, जिथे महादेवांनी त्रिपुरासुकराचा वध केला, जाणून घ्या या देवस्थानाची माहिती

सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे भीमाशंकर देवस्थान हे भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग आणि महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमानदी उगम पावते.

5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग भीमाशंकर, जिथे महादेवांनी त्रिपुरासुकराचा वध केला, जाणून घ्या या देवस्थानाची माहिती
Bhimashankar
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 9:03 AM

पुणे : सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे भीमाशंकर देवस्थान हे भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग आणि महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमानदी उगम पावते. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.

भीमाशंकर मंदिराची आख्यायिका काय?

भीमाशंकर लाडाकिन्नम भीमाशंकरम या नावानेही ओळखलं जातं. हे अनादी काळापासुन ते स्वयंभु असल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात शिवशंकराचा एक मोठा भक्त होता त्रिपुरासुर. त्याला वरदान मिळाल्याने तो उन्मत्त झाला होता. तेव्हा त्रिपुरासुर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वराचे रुप धारण केले आणि त्रिपुरासुर राजाचा वध केला. त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले.

BHimashankar

भीमाशंकर मंदिर

भीमाशंकर घनदाट अरण्याने वेढलेले आहे

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

1200 ते 1400 वर्ष जुने मंदिर

हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे.

हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.

शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भिमाशंकराच्या दर्शनास येत असत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ झाले आहे –

गुप्त भीमाशंकर – भीमानदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे. परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. हे ठिकाण गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते.

कोकण कडा – भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे 1100 मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम – कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी – आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे. कोकण आणि परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

संबंधित बातम्या :

Nag Panchami 2021 | या मंदिरात स्वत: नागराज तक्षक निवास करतात, फक्त नाग पंचमीलाच उघडतात मंदिराचे द्वार

भगवान विष्णूचे परम भक्त आहेत देवर्षी नारद, का दिला आपल्याच पित्याला इतका मोठा शाप, जाणून घ्या