चलो अयोध्या… भाजपचा अयोध्यावारीचा मेगा प्लान, शिंदे सरकार ‘या’ तारखेला दर्शन घेणार; प्रत्येक राज्याचा टाइम टेबल तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण केलं. मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या सोहळ्याला जगभरातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. या सोहळ्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं. आपले प्रभू राम परत आलेत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते आजपर्यंत राम मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली आहे.
संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 24 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण केलं. मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या सोहळ्याला जगभरातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. या सोहळ्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं. आपले प्रभू राम परत आलेत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते आजपर्यंत राम मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली आहे. देशभरातून भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. तर, दुसरीकडे भाजपने प्रभू रामाच्या दर्शनासाठी मेगा प्लान तयार केला आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा हा मेगा प्लान तयार करण्यात आला आहे.
अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपने आता अयोध्यावारीचा टाइम टेबल तयार केला आहे. भाजपशासित प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळासह अयोध्येत दर्शनाला येणार आहेत. त्यासाठी भाजपने प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दर्शनाची वेळही दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दर्शनासाठी 5 फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारी रोजी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतानाच शरयू किनारी महाआरतीही करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
असा आहे भाजपचा दर्शनासाठीचा मेगा प्लान
31 जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दर्शनाला जाणार
6 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
9 फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
12 जानेवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
15 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री दर्शनाला जाणार
22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री आणि 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री दर्शनाला जाणार
4 मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार
निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी
लोकसभेच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने तर थेट जानेवारीपासून मार्चपर्यंत अयोध्यावारीचा मेगा प्लान तयार केला आहे. भाजपच्या या मेगा प्लानकडे निवडणुकीच्या दृष्टीकोणातून पाहिलं जात आहे. भाजपच्या या खेळीमुळे विरोधकांची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.