Pune Ganesh Utsav | पुणेकरांना एका दिवसांत किती टन लागले मोदक अन् पेढे
Pune Ganesh Utsav | राज्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाचा उत्सव सुरु आहे. घराघरात श्रीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या प्रसादासाठी मोदक आणि पेंढ्यांना पसंती दिली जाते. यंदा पुणे शहरात मोदकची प्रचंड मागणी होती.
पुणे | 22 सप्टेंबर 2023 : राज्यात मंगळवारी गणरायाचे उत्सवात आगमन झाले. सर्वत्र वाजत, गाजत ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घराघरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. अनेक ठिकाणी स्थापनेच्या वेळी गुरुजी मिळाले नाही. यामुळे काहींनी धार्मिक पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीनुसार तर काही ठिकाणी इंटरनेटवर गणरायाच्या स्थापनेच्या दिलेल्या माहितीनुसार विधिवत स्थापना केली. यावेळी प्रसाद म्हणून पेढे आणि मोदक यांना मोठी मागणी आली. पुणे शहरात एकाच दिवसांत मोठ्या प्रमाणावर मोदक आणि पेढ्यांची विक्री झाली.
किती टन पेढे लागले पुणेकरांना
पुणेकरांकडून गणपतीच्या स्वागतासाठी कात्रजचे मोदक आणि मिठाईची विक्रमी खरेदी झाली. एका दिवसात फक्त कात्रजचे १८ टन पेढे-मोदक लागले. इतर मिठाईवाल्यांकडूनही १० ते १२ टन मोदक, पेढे विकले गेले. यामुळे जवळपास ३० टन पेढे आणि मोदकची विक्री एका दिवसांत पुण्यात झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत १० टक्के विक्रीत वाढ झाली आहे. गणपतीचा आवडता प्रसाद मोदक असल्यामुळे मोदक खरेदीला प्राधान्य देण्यात आले.
विविध प्रकारचे मोदक बाजारात
गणपतीच्या प्रसादासाठी फक्त माव्याचे नाहीतर विविध प्रकारचे मोदक बाजारात उपलब्ध होते. शंभरापेक्षाही जास्त मोदकचे प्रकार यंदा मिठाईवाल्यांनी तयार केले होते. त्यात आंबा मोदक, मावा मोदक, उकडीचे मोदक, आणि तळलेले मोदक यांना चांगली मागणी होती. लहान मुलांसाठी अनेक पालकांनी चॉकलेट मोदक विकत घेतले. खवा, खोबरे, दाणे बारीक करून हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवलेल्या या मोदकांना चांगील मागणी होती.
अनेकांनी घरात केले मोदक
मिक्स मोदक गणपती बाप्पांसाठी अनेकांनी घरात तयार केले. पनीर, खवा, साखर, केशर, वेलचा वापर करुन हे मोदक बनवले गेले. तांदळाचे गुलकंदी मोदक अनेक भाविकांनी तयार केले. पंचखाद्य मोदक खारीक, खसखस, बदाम, काजूपासून घराघरात तयार केले गेले. यामुळे एकाच दिवसात घराघरात मोदक विक्रमी संख्येने तयार झाले. यामुळे घराघरातील बच्चे कंपनी चांगलीच खूश होती.