Salman Khan | भाचीला उचलून सलमान खानकडून बाप्पाची आरती; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खानच्या घरी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यावेळी खान कुटुंबीयांनी भक्तीभावाने गणरायाची आरती केली. खुद्द सलमानने या आरतीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : मंगळवारी अत्यंत जल्लोषाने घराघरात आणि सार्वजनिक मंडळात गणरायाचं आगमन झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी सलमानचं संपूर्ण कुटुंब तिच्या घरी गणपती बाप्पाच्या आरती आणि पूजेसाठी पोहोचली होती. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई सलमा यांनी मिळून गणपतीची आरती केली. या आरतीचा खास व्हिडीओ सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी सलमाननेही भाचीला खांद्यावर उचलून बाप्पाची मनोभावे आरती केली. ‘गणपती बाप्पा मोरया’ असं कॅप्शन लिहित त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सलमानने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये आधी कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजेच आईवडिलांनी आरती केली. त्यावेळी सलमान अर्पिता आणि आयुषच्या मुलीला खांद्यावर उचलून बाजूला उभा होता. त्यानंतर सलमानने भाचीसोबत मिळून बाप्पाची आरती केली. सलमानच्या नंतर बहीण अलविरा अग्निहोत्री खान, हेलन, सोहैल खान आणि त्याचा मुलगा योहान, अतुल अग्निहोत्री यांनी आरती केली. सलमान खानने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांत त्याला 400 हजार लाइक्स मिळाले. तर गेल्या दहा तासांत आरतीच्या या व्हिडीओला तब्बल नऊ लाख 38 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
सलमानच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मी धर्मनिरपेक्ष सलमान भाईचा चाहता असल्याचा मला अभिमान आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमान हा सर्वांत धरनिरपेक्ष भारतीय आहे’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे. दरवर्षी सलमानच्या घरी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि संपूर्ण खान कुटुंबीय बाप्पाची मनोभावे पूजाअर्चना करतात. हीच प्रथा खान कुटुंबाने यावर्षीही कायम ठेवली आहे.
सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा अभिनेत्री कतरिना कैफसोबत काम करताना दिसणार आहे. ‘टायगर’ सीरिजमधील हा तिसरा चित्रपट आहे. यामध्ये सलमान आणि कतरिनासोबतच इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर सलमानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.