Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांचे गाव तरी कोणते? 40 वर्षांपासून नाही गेले घरी, वाट पाहतायेत गावकरी?
Premanand Maharaj Villagers : प्रेमानंद महाराज यांचे अनुयायी आणि सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. सर्वच धर्मातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. त्यात अनेक सेलिब्रिटी आणि बड्या नेत्यांचा, साधु संताचा समावेश आहे. प्रेमानंद महाराज हे त्यांच्या गावी गेल्या 40 वर्षांपासून गेलेले नाहीत.

प्रेमानंद महाराज आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. कोणतेही कर्मकांड नाही, केवळ नाम जप करा असा साधा सोपा उपाय ते सांगतात. अनेकांच्या जीवनातील समस्या, अडचणीवर ते मार्गदर्शन करतात. त्यात अवडंबर नसते. तर साधा उपाय असतो. प्रेमानंद महाराज यांना एका शारीरिक व्याधीने पछाडलेले असताना ही मनोबलाच्या साधनेवर त्यांची प्रसन्न मुद्रा अनेकांना बळ देते. पण महाराज गेल्या 40 वर्षांपासून त्यांच्या मूळ गावी गेलेले नाहीत.
कोणते आहे मूळ गाव?
उत्तर प्रदेशात त्यांचे मूळ गाव आहे. कानपूर जिल्ह्यातील अगदी टोकाचे नरवळ हे त्यांचे गाव आहे. सरसौल या भागात ते येते. येथील प्राथमिक शाळेपासून जाणाऱ्या एका गल्लीत त्यांचे घर आहे. हे घर दोन मजली आहे. या घराच्या बाहेर श्रीगोविंद शरणजी महाराज वृंदावन जन्मस्थळ अशा आशयाची एक पाटी सुद्धा आहे. वृदांवन येथील प्रेमानंद महाराज यांचे हे मूळ घर आहे. हे घर त्यांनी 40 वर्षांपूर्वी सोडले आणि संन्यास घेतला.




अवघ्या 13 व्या वर्षी घर सोडले
प्रेमानंद महाराज यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झाले. इयत्ता 9 वी मध्ये त्यांचा प्रवेश झाला. चार महिने ते शाळेत गेले. महादेवाच्या पिंडीसाठी ओटा उभारणीचे काम त्यांनी सुरू केले. त्यावेळी कोणीतरी त्यांना विरोध केला. त्यांनी प्रयत्न केला. पण काम अर्धवट राहिले. यामुळे ते मनातून अत्यंत नाराज झाले. ही गोष्ट 1985 मधील आहे. त्यावेळी ते 13 वर्षांचे होते. एक दिवस सकाळी 3 वाजता ते घर सोडून निघून गेले. त्यांचा खूप शोध घेतल्यावर जवळीलच एका शिव मंदिरात ते आढळले. त्यांनी घरी येण्यास नकार दिला.
त्यांचे मोठे भाऊ गणेश दत्त पांडेय हे त्यांची लहानपणीची ही आठवण सांगताना भावुक झाले. पुढे सैमेंसी या गावातील शिव मंदिरात ते चार वर्षे पूजा अर्चना आणि ध्यान करत होते. पण एक दिवस त्यांनी हा परिसर सोडला आणि ते थेट वृंदावनात आले. पुढे त्यांचे उभे आयुष्य गंगा घाटावर साधनेत गेले. ते केवळ एकवेळेस जेवत. जर त्यांच्या निश्चित वेळेत जेवण मिळाले तरच ते ग्रहण करत नाही तर गंगेच्या पाणी पिऊन तो दिवस पुढे ढकलत.
आज त्यांचे मित्र, गावकरी त्यांची वाट पाहत आहेत. त्यांनी एकदा तरी गावी यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या काळातील शाळा आता मोडकळीस आली आहे. पण तिच्या आठवणी त्यांच्या मित्रांच्या मनात रूंजी घालतात. ते लहानपणापासूनच धार्मिक कार्यात गुंतलेले असल्याचे मित्र सांगतात.