Gurucharitra | जन्मानंतर लगेच ॐचा जप, नरहरी म्हणून प्रसिद्ध जाणून घ्या श्रीनृसिंह सरस्वती स्वामींची संपूर्ण माहिती
श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार मानले जातात. श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. श्रीगुरुचरित्र हा वेदतुल्य त्यांच्याच जीवनावर आधारित आहे.

मुंबई : भारतात अनेक धर्म संप्रदाय आहेत त्यातील दत्तसंप्रदाय हा मुख्य मानला जातो. यालाच अवधूत संप्रदाय देखील म्हणतात. दत्त हेच त्यांचे आराध्य दैवत असते. जसा रामदासी पंथीयांना दासबोध महत्त्वाचा आहे तसेच दत्तभक्तांना श्रीगुरूचरित्र हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० असा आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार मानले जातात. श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. श्रीगुरुचरित्र हा वेदतुल्य त्यांच्याच जीवनावर आधारित आहे.
श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी झाला .करंज नगरातील ब्राह्मणाची सुकन्या ‘अंबा’यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्माची एक कथा सांगण्यात येते जन्मानंतर ते रडले नसून ते ॐचा जप करू लागले. तेव्हा उपस्थित ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. वयाच्य सात वर्षापर्यंत त्यांनी ॐकाराखेरीज कोणताच दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही.
पुढे त्यांनी काशीतील तत्कालीन सर्वश्रेष्ठ संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली. तेव्हा त्यांचे नाव‘श्री नृसिंहसरस्वती’असे ठेवण्यात आले. पायी खडावा, कटीला कौपीन अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वती सर्वांना मनावर कोरले गेले. गाणगापुर येथे श्रीगुरूंनी जवळजवळ तेवीस वर्षे वास्तव्य करून लोकांचा उद्धार केला त्यामुळे गाणगापुरास दत्तपंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
श्रीनृसिंह सरस्वती स्वामींची आरती
अनसूयात्मज हे जगपालका । तुजविणा कुणि ना जगि बालका । तरि कथी स्मरूं मी कवणाप्रति । शरण मी नरसिंहसरस्वती ।। १ ।। मग मला गमला पथ हा बरा । तव पदींच असो नित्य आसरा । पुरती हेतू कधीं मम हे कथीं । करि दया नरासिंहसरस्वती ।। २ ।। मज कडोनिच घेऊनी चाकरी । मगहि देशिल योग्य न ते जरी । शिशुस मोबदला कुणि मागती । कथि बरे नरसिंहसरस्वती ।। ३ ।। नति तुझ्या पदीं अर्पिति किंकर । अभय दे शिरि ठेवि गुरो कर । स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ४ ।। मदीय लोचन सार्थक जाहले । सगुण सद्गुरू सद्रुप पाहिले । बघ मना रूप मंगल हे किती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ५ ।। तव कृपेविण जीवचि घाबरे । अभय दे श्िरि ठेवचि हस्त रे । तव पथा गुरू वासचि पाहती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ६ ।। बहुत भोगियल्या गुरू आपदा । चुकवि दावि अता तुझिया पदा । द्रुतगती अजि धावचि संकटी । करि दया नरसिंहसरस्वती ।। ७ ।। कितीतरी अळवू तुज श्रीगुरू । बहुत ही श्रमलें भवि लेकरूं । कशि दया तुजला लव ये न गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ९ ।। तुज समक्ष अरी मज गांजिती । लवभरी तुजला कशी ना क्षिती । उगिच कां त्रिशुला धरिलें अगा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ९ ।। मदीय प्राण हरीलाचि काळ तो । मग तुझा उपयोगचि काय तो । म्हणुनि मी पुसतो कधिं येशि गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। १० ।। सदयता हृदयीं लव तूं धरी । भजनि मंडळी हे गुरू उध्दरी । स्वकिय आप्त रिपू आणि निंदका । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ११ ।। अदयता धरिली अशि कां बरे । भवपुरी बुडतो जिव घाबरे । पुरवि हेतु न मी गुरू दास गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। १२ ।।
।। अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त ।।
संदर्भ : श्री दत्त महाराज संकेतस्थळ
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधीत बातम्या :
केवळ ‘ओम’ नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व
Chandra Darshan 2022 | आजचे ‘चंद्र दर्शन’ देईल वैभव, पैसा आणि सर्वकाही, जाणून घ्या महत्त्व