IPL 2021: परदेशी खेळाडूंची माघार, अश्विनची एक्झिट; कोरोनामुळे आयपीएल स्पर्धेवर परिणाम होणार का?
बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्याच्या तक्रारी खेळाडू करत आहेत. | IPL 2021 coronavirus
मुंबई: गेल्या काही दिवसांत भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारताचा फिरकीपटून आणि दिल्ली डेअरडेविल्सचा प्रमुख खेळाडू आर.अश्विन याने सोमवारी आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ रॉयर चॅलेंजर्स बंगळुरु संघातील अॅडम झम्पा आणि केन रिचडर्सन या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपण मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले. (How Covid anxiety is affecting cricketers in the IPL 2021)
काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय यानेही IPL 2021 स्पर्धेतून माघार घेतली होती. भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याची चर्चा आहे.
तसेच दिल्ली, मुंबई आणि चेन्नईतील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे या शहरांमध्ये नियोजित असलेल्या सामन्यांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशातच देशी-परदेशी खेळाडुंनी कोरोनाच्या संकटकाळात IPL 2021 स्पर्धा कशी काय खेळवली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यातही अशीच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण आयपीएल स्पर्धा पूर्णपणे खेळवली जाणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आयपीएल स्पर्धेतून आतापर्यंत किती खेळाडुंनी माघार घेतली?
IPL 2021 स्पर्धेतून आतापर्यंत पाच खेळाडुंनी माघार घेतली आहे. यामध्ये आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे.
आर. अश्विनची आयपीएल स्पर्धेतून माघार का?
आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय, “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन ”
बायो बबलमुळे खेळाडुंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम?
दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.
इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.
दिल्लीतील आयपीएलचे सामने रद्द होणार?
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. परिणामी दिल्लीतील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 36 टक्के इतक्या उच्चांकी पातळीला जाऊन पोहोचला आहे.
तरीही बीसीसीआयने दिल्लीत आयपीएल सामने खेळवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. बायो बबल आणि सुरक्षेच्या अन्य उपाययोजनांमुळे खेळाडुंना कोरोनाची बाधा होणार नाही, असा बीसीसीआयचा दावा आहे. एवढेच नव्हे तर आयपीएल सामने खेळवण्यात येणाऱ्या शहरांतील विमानतळांवर आयपीएलच्या खेळाडुंसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!
IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’
(How Covid anxiety is affecting cricketers in the IPL 2021)