“माझी मुलगी…”, ‘तो’ व्हिडीओ पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बसला मोठा धक्का
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव नुसतं उच्चारलं तरी क्रिकेटचा एक अख्खा इतिहास डोळ्यासमोरून जातो. सचिनच्या नावाची भूरळ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना देखील आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपलं प्रोडक्ट जनमानसांपर्यत पोहोचावं यासाठी सचिनच्या नावाचा वापर करून घेतला. असं असताना एक जाहीरात पाहून खुद्द सचिनला धक्का बसला आहे. अखेर त्याला पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

मुंबई : देशात गेल्या काही दिवसांपासून डीपफेकचं प्रकरण गाजत आहेत. अनेक सेलिब्रिटींना या तंत्रज्ञानाचा नाहक त्रास भोगावा लागला आहे. याची अनेक उदाहरणं ताजी असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला विचित्र अनुभव आला आहे. एका व्हिडीओमुळे सचिनची झोप उडाली आहे. त्यामुळे तात्काळ त्याला आपल्या एक्स अकाउंटवर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. या फेक व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर एका मोबाईल गेमिंगचा प्रचार करताना दिसत आहे. तसेच युजर्संना झटपट पैसा कमवण्याचा मार्ग सांगत आहे. फेक व्हिडीओत सचिनचा वापर करून त्याच्या तोंडून असं सांगण्यात येत आहे की, ‘मला माहिती नव्हतं की पैसे कमवणं इतकं सोपं आहे. माझी मुलगी या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे.’
व्हिडीओ पोस्ट करत सचिन तेंडुलकरने स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात होत असलेल्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सचिन तेंडुलकरने लिहिलं आहे की, “हा व्हिडीओ फेक आहे आणि फसवणुकीच्या हेतूने बनवला गेला आहे. तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर चुकीचा आहे. माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की जाहिरातीत असा व्हिडीओ दिसला तर रिपोर्ट करा.”
“सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवर लवकरात लवकर कारवाई केली पाहीजे. त्यांची भूमिका याबाबतीत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे चुकीच्या सूचना आणि बातम्यांवर रोखता येतील आणि डीपफेकचा गैरवापर संपुष्टात येईल.”, असंही सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं.
These videos are fake. It is disturbing to see rampant misuse of technology. Request everyone to report videos, ads & apps like these in large numbers.
Social Media platforms need to be alert and responsive to complaints. Swift action from their end is crucial to stopping the… pic.twitter.com/4MwXthxSOM
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 15, 2024
सचिन तेंडुलकरने आपली पोस्ट केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या सायबर सुरक्षा आणि एजेंसीला टॅग केला आहे. मागच्या काही दिवसात डीपफेकचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यात रश्मिका मंधाना, काजोल, अनुष्का सेन, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ आणि रतन टाटा यासारख्या दिग्गजांचा गैरवापर केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चिंता व्यक्त केली होती. तसेच लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असं संबंधित यंत्रणांना सांगितलं आहे.