‘त्या’ टीकेनंतर डेविड वॉर्नरने अखेर मौन सोडलं, मिचेल जॉनसनला असा शब्दात सुनावलं
मिचेल जॉनसन आणि डेविड वॉर्नर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. रोज या वादात नवीन काहीतरी घडत असतं. पण डेविड वॉर्नर मात्र या वादापासून लांबच होता. अखेर त्याने मौन सोडत मिचेल जॉनसनला अप्रत्यक्षरित्या बरंच काही सुनावलं आहे. कौटुंबिक उदाहरण देत बरंच काही सांगून टाकलं आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही कसोटी मालिका डेविड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दितील शेवट असणार आहे. वॉर्नर आपल्या होम ग्राउंड सिडनीमध्ये कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. पण या मालिकेसाठी डेविड वॉर्नरची संघात निवड केल्याने आणि निवृत्तीसाठी इतका रंगारंग कार्यक्रम ठेवल्याने मिचेल जॉनसनने संताप व्यक्त केला आहे. एखाद्या हिरोप्रमाणे त्याला निवृत्ती देण्याबाबत आक्षेप घेतला आहे. सँड पेपर स्कॅममध्ये पूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेटची नाचक्की झाली होती. या प्रकरणी डेविड वॉर्नरला शिक्षाही झाली. त्या क्रिकेटपटूला अशा पद्धतीने निवृत्ती देणं म्हणजे शर्मेची बाब असल्याची टीका मिचेल जॉनसन याने केली होती. हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आता या वादाबाबत मौन धरून असलेल्या डेविड वॉर्नरने अखेर तोंड उघलं आहे. तसेच अप्रत्यक्षरित्या मिचेल जॉनसनला बरंच काही सुनावलं आहे.
काय म्हणाला डेविड वॉर्नर?
डेविड वॉर्नरने वादावर बोलताना सांगितलं की, ‘हेडलाईन्स शिवाय समर क्रिकेट होऊ शकत नाही. जे काही आहे ते आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्या पुढे जात आपल्याला चांगल्या कसोटी सामन्याची आशा आहे. माझ्या आई वडिलांनी माझी चांगल्या प्रकारे देखभाल केली आहे. त्यांनी मला प्रत्येक दिवशी मेहनत करणं शिकवलं आहे. माझ्या आई वडिलांनी ही बाब माझ्यात रुजवली आहे.’
‘जेव्हा तुम्ही जागतिक पातळीवर जाता तेव्हा नेमकं काय घडतं याचा अंदाज येत नाही. प्रत्येक ठिकाणी मीडिया असते. खूप टीका होते. बरंच काही सकारात्मकही असते. मला असं वाटतं की आज तुमच्या काही महत्त्वाचं आहे. लोकं आज इथे क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी येत आहे. ही खरंच चांगली बाब आहे.’, असंही डेविड वॉर्नर पुढे म्हणाला.
मिचेल जॉनसनने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी, 153 वनडे आणि 30 टी20 सामने खेळले आहेत. जॉनसनने कसोटीत 313, वनडेत 239 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 38 गडी बाद केले आहेत. दुसरीकडे, डेविड वॉर्नर 109 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 25 शतकं, 3 द्विशतकं, 36 अर्धशतकांचा समावेश आहे. यात 335 हा सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर गोलंदाजीत 4 गडी बाद करण्यात यश मिळालं आहे.