Asia cup 2022: ग्रुप ‘ए’ मध्ये भारत-पाकिस्तान सोबत तिसरा संघ ठरला
Asia cup 2022: यंदा आशिया कप (Asia cup) मध्ये क्वालिफायर गटातून दाखल होणाऱ्या संघांना सुद्धा संधी मिळणार आहे.
मुंबई: यंदा आशिया कप (Asia cup) मध्ये क्वालिफायर गटातून दाखल होणाऱ्या संघांना सुद्धा संधी मिळणार आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान सोबत हाँगकाँगचा संघही पात्र ठरला आहे. हाँगकाँगच्या टीमने (Hongkong Team) संयुक्त अरब अमिरातीचा 8 विकेटने पराभव केला. क्वालिफायिंग राऊंड मध्ये सहा पॉइंटसह हाँगकाँगचा संघ अपराजित राहिला. निझाकत खानचा (Nizakat Khan) संघ आता ग्रुप ए मध्ये भारत-पाकिस्तान संघांविरुद्ध खेळणार आहे. प्रथम फलंदाजी करताना यूएईच्या संघाने हाँगकाँगला विजयासाठी 148 धावांचे टार्गेट दिले होते. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी सुरुवातीच्या तीन विकेट लवकर गमावल्या. हाँगकाँगचा एहसान खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 24 धावात 4 विकेट काढल्या. कॅप्टन सीपी रिझवानने सर्वाधिक 49 धावा केल्या. झरावर फरीदने 41 चेंडूत 27 धावा केल्या.
हाँगकाँगची मजबूत सुरुवात
लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगने मजबूत सुरुवात केली. निझाकत खान आणि यासिम मुर्तझाने 85 धावांची सलामी दिली. निझाकत आणि यासिम बाद झाल्यानंतर बाबर हयात आणि किंचित शाहने 6 चेंडू राखून हाँगकाँगला विजय मिळवून दिला. यासिम मुर्तझाने 43 चेंडूत 58 धावा केल्या. हयात 38 धावांवर नाबाद राहिला.
महामुकाबला 28 ऑगस्टला
आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे. आधी ही स्पर्धा श्रीलंकेत सुरु होणार होती. पण आर्थिक संकटामुळे तिथली परिस्थिती भीषण असल्याने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती मध्ये हलवण्यात आली. पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्ता मध्ये होणार आहे. रविवारी भारत-पाकिस्तान मध्ये महामुकाबला रंगेल. संपूर्ण क्रिकेट जगताला या लढतीची उत्सुक्ता आहे.