Pakistan Team : आशिया कप स्पर्धेतील पराभवामुळे पाकिस्तानला मोठा फटका, भारताला झाला असा फायदा
Pakistan Loss : आशिया कप स्पर्धेतील पराभवामुळे पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे. सर्वोत्तम गोलंदाजांची फळी असलेल्या पाकिस्तानला जेतेपदाचा विश्वास होता. मात्र आता पराभवामुळे रयाच गेली. जेतेपदाचं स्वप्न तर भंगलंच त्याच आयसीसी रॅकिंगमध्ये मोठा फटका बसला आहे.
मुंबई : आशिया कप स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र सुपर 4 फेरीतच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. सुरुवातीला भारताने 228 धावांनी पराभूत केल्यानंतर श्रीलंकेनही वचपा काढला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्याचबरोबर आयसीसी रॅकिंगमध्येही फटका बसला आहे. आशिया कप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान होता. मात्र सलग पराभवामुळे गुणांमध्ये फरक पडला आणि क्रमवारीत घसरण झाली आहे. दुसरीकडे, आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारतीय संघाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला नंबर एकचं स्थान गाठणं शक्य होणार आहे. आयसीसीच्या क्रमावारीत गुणांची कशी घालमेल झाली आहे ते पाहुयात…
आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर एकच गणित कसं ते जाणून घ्या
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज वनडे सामना होत आहे. दुसरीकडे भारत आणि बांगलादेश यांच्यातही सामना आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यांचा निकालाचा परिणाम आयसीसी क्रमवारीवर होणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि भारताने बांगलादेशवर विजय मिळवला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान होईल. म्हणजेच तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर असेल.
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन संघ 118 गुणांकनासह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात आज आणि 17 सप्टेंबरला वनडे सामना आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे 2-1 ने आघाडी आहे. दोन सामने उरले असून यावरून नंबर एकचं गणित स्पष्ट होणार आहे. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने गमावले तर मात्र एक नंबर गमवावा लागेल. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही तीन सामन्यांची वनडे मालिका आहे.
भारत : भारतीय संघ 116 गुणांकनासह दुसऱ्या स्थानावर आहे. आशिया कप स्पर्धेतील दोन सामने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका यामुळे क्रमवारीत अव्वल स्थान गाठणं सोपं आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना भारताने जिंकला आणि ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला तर आजच वनडे रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थान असेल.
पाकिस्तान : आशिया कप स्पर्धेत सुमार कामगिरी केल्याने पाकिस्तानला अव्वल स्थान गमवावं लागलं आहे. 115 गुणांकनासह तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी एकही वनडे सामना नसल्याने आता अव्वल स्थान पुन्हा गाठण्याची संधीच नाही. त्यामुळे अव्वल स्थानासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात चुरस असणार आहे.