Asia Cup 2023 च्या आयोजनावरुन वाद टोकाला, टीम इंडिया खेळणारच नाही? जाणून घ्या
आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरु आहे. बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये आतापर्यंत अनेकदा खटके उडाले आहेत. याबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे.
मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबर महिन्यात करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान हा पाकिस्तानला मिळाला आहे. यामुळेच गेल्या अनेक महिन्यांपासून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद सुरु आहे. आशिया कप पाकिस्तानमध्ये नियोजित असल्याने बीसीसीआयचा विरोध आहे. आमचे खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळणार नाहीत, अशी भूमिका बीसीसीआयची आहे.
बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील वादावर तोडगा म्हणून टीम इंडिया-पाकिस्तानचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र बीसीसीआयने पीसीबीचा हा प्रस्तावही फेटाळला. बांगलादेश आणि श्रीलंकेनेही बीसीसीायच्या भूमिकेशी सहमती दर्शवली होती. मात्र यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडिया Asia Cup खेळणार नाही?
पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेश आणि श्रीलंकाने आशिया कप 2023 साठी हायब्रिड मॉडेलला पाठिंबा दर्शवला आहे. आशिया कपच्या हिशोबाने हायब्रिड म्हणजे भारत-पाक यांच्यातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतील. त्यामुळे पाकिस्तानकडेच यजमानपद राहिल. थोडक्यात काय तर या हायब्रिड मॉडेलमुळे आशिया कपचं आयोजन ही पार पडेल. तसेच बीसीसीआय-पीसीबी यांच्यातील आयोजनाच्या वादावरही पडदा पडेल.
रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आशिया कपच्या यजमानपदावरुन पीसीबीच्या हायब्रिड मॉडेलवर चर्चेसाठी बैठक बोलावली आहे. या मॉडेलवर चर्चा करण्यासाठी बैठकीत आशियाई क्रिकेट काउन्सिलचे सदस्य असणार आहेत. हायब्रिड मॉडेलनुसार आशिया कपचं ठरलं, तर टीम इंडिया स्पर्धेतून माघार घेऊ शकते.
पाकिस्ताकडून 2 पर्याय
पीसीबीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी हायब्रिड मॉडेलमध्ये 2 पर्याय दिले आहेत. त्यानुसार पहिल्या पर्यायात टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतील. तर उर्वरित सामन्यांचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये होईल. तर दुसऱ्या पर्यायात 2 टप्प्यात विभाजन करण्यात आलंय. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील सामने हे पाकिस्तानमध्ये होतील. तर दुसरा टप्पा त्रयस्थ ठिकाणी आयोजित केला जाईल. तसेच अंतिम सामनाही त्रयस्थ ठिकाणी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या दुसऱ्या पर्यायाबाबत सकारात्मक आहे.
बीसीसीआय अधिकारी काय म्हणाले?
“पाकिस्तानने ठेवलेला प्रस्तावाबाबत मला माहिती नाही. मात्र आमच्यानुसार कोणताही बदल नाही. आम्ही आशिय कप हा त्रयस्थ ठिकाणी व्हावा यासाठी आग्रही आहोत. आम्हाला यूएईचा पर्यायही नको. यूएईत असलेल्या उष्णतेमुळे आमच्या खेळाडूंना नुकसान पोहचेल, अशी जोखीम आम्ही घेणार नाहीत. श्रीलंका हा या स्पर्धेसाठी उत्तम पर्याय आहे. पाकिस्तानच्या या हायब्रिड मॉडेलबाबत आमच्या काहीही चर्चा झालेली नाही. आम्ही याबाबत निर्णय घेऊ”, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्स माहिती दिली.
आशिया कपचं 1984 पासून आयोजन
दरम्यान आशिया कप स्पर्धेचं 1984 पासून आयोजन केलं जात आहे. यंदा नेपाळ क्रिकेट टीमही अशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. नेपाळ आशिया कपसाठी पात्र ठरली आहे. नेपाळ टीम यूएईचा पराभव करत आशिया कपसाठी पात्र ठरली. त्यामुळे नेपाळ पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळणार आहे. नेपाळआधी टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी थेट क्वालिफाय केलं आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान 3 वेळा भिडणार?
आशिया कप स्पर्धेत एकूण 6 सहभागी होणार आहेत. या 6 संघांची विभागणी एकूण 2 ग्रुपमध्ये प्रत्येकी 3-3 या पद्धतीने होणार आहे. या एका ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि 1 क्वालिफायर टीम असणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधून टॉपच्या 2 टीम या सुपर 4 मध्ये पोहचतील. इथे प्रत्येक टीम एकमेकांशी भिडतील. त्यानंतर 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात किमान 2 आणि कमाल 3 वेळा मॅच होऊ शकतात. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. यापैकी टीम इंडिया 5 सामने खेळणार आहे.