आथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाचा वेन्यू ठरला, जाणून घ्या कधी होणार ‘शुभमंगल सावधान’
मागच्या बऱ्याच दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा आहे. या दोघांच लग्न कधी होणार? असा प्रश्न राहुलच्या चाहत्यांना पडला आहे.
मुंबई: मागच्या बऱ्याच दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा आहे. या दोघांच लग्न कधी होणार? असा प्रश्न राहुलच्या चाहत्यांना पडला आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार लवकरच हे जोडपं आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकणार आहे. सुनील शेट्टीच्या बंगल्यात दोघांचं लग्न होणार असल्याची माहिती आहे. खंडाळ्यात सुनील शेट्टीचा शानदार बंगला आहे.
‘जहान’ या बंगल्याचं नाव आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत याच आलिशान बंगल्यात दोघांच शुभमंगल पार पडेल. तारीख नाही, पण अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाचा वेन्यू फायनल झाला आहे.
आधी लग्न कुठे होणार होतं?
मागच्या काही वर्षांपासून अथिया आणि राहुल रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विवाहबद्ध होणार असं बोललं जात होतं. ताज्या रिपोर्ट्सनुसार, या कपलने हॉटेल ऐवजी वेडिंग वेन्यूसाठी सुनील शेट्टीच्या बंगल्याची निवड केलीय.
दोघे लिव-इन रिलेशनशिपमध्ये
केएल राहुल आणि अथिया शेट्टी सध्या वांद्रे येथील एका सी फेसिंग अपार्टमेंट मध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहतायत. दोघांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे अंदाज वर्तवले जातात. सुनील शेट्टी यांनी अलीकडेच या बद्दल माहिती दिली होती. दोघं लग्न करणार, पण तारीख माहित नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. केएल राहुलच्या शेड्युलनुसार लग्नाच्या तारखा फायनल केल्या जातील, असंही सुनील शेट्टीने सांगितलं होतं.
कधी होणार लग्न?
सध्या दोघांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. वेडिंग ऑर्गनायजर्सनी अभिनेता सुनील शेट्टीच्या बंगल्याची जाऊन पाहणी सुद्धा केली. जवळचे नातलग आणि मित्र परिवाराला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खास वेळ काढायला सांगितला आहे. यावरुन लगीनघटिका आता समीप आल्याच स्पष्ट होतं.