Ashes Series : प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
Ashes Series 2025 26 Full Schedule: प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची ही मालिका होणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या 2 कट्टर संघामध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. उभयसंघात 2025-2026 या दरम्यान एकूण 5 सामन्यांची ही मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. मालिकेतील पहिला सामना हा पर्थ स्टेडियममध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल 43 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पर्थ क्रिकेट स्टेडियमला एशेस सीरिजमधील सलामीचा सामना खेळवण्याचा मान मिळाला आहे.
मालिकेचं वेळापत्रक
मालिकेतील सलामीचा सामना हा 21 ते 25 नोव्हेंबर दरम्या पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा डे नाईट असणार आहे. हा सामना 4 ते 8 डिसेंबरमध्ये ‘द गाबा, ब्रिस्बेन’ येथे आयोजित करण्यात आला आहे. तिसरा सामना हा एडेलड ओव्हल येथे 17 ते 21 डिसेंबरमध्ये होणार आहे. चौथा सामना डिसेंबर 26 ते 30 दरम्यान पार पडेल. हा सामना बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे. तर पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे नववर्षात होणार आहे. हा सामना 4 ते 8 जानेवारी 2026 दरम्यान पार पडणार आहे.
यंदा एशेस सीरिजच्या यजमानपदाचा मान हा ऑस्ट्रेलियाकडे आहे. गेल्या एशेज सीरिजचं आयोजन हे इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. तेव्हा ही प्रतिष्ठेची मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली होती. आगामी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीचा भाग असणार आहे. या मालिकेत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. जो रुट सध्या दमदार कामगिरी करतोय. या मालिकेला अजून वर्षभराचा कालावधी आहे. मात्र त्यानंतरही रुटकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतर देशांमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या जो रुट याला ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकदाही कसोटी शतक करता आलेलं नाही. त्यामुळे जो रुटसमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक करण्याचं आव्हान असणार आहे.
असं आहे वेळापत्रक
🚨 Men’s Ashes 2025-26! 🏟
Dates and venues have been confirmed and released 📝 👇
🇦🇺 #AUSvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) October 16, 2024
एशेस मालिकेत वरचढ कोण?
दरम्यान आतापर्यंत एकूण 73 वेळा एशेस मालिका खेळवण्यात आली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या तुलनेत फक्त 2 वेळा ही मालिका जिंकण्यात यश मिळवलंय. कांगारुंनी तब्बल 34 वेळा या मालिकेवर आपलं नाव कोरलंय. तर इंग्लंडने 32 वेळा एशेस ट्रॉफी उंचावली आहे. तर 2 वेळा ही मालिका बरोबरी राहिली आहे.