SA vs AUS Wtc Final : टीम इंडियाचं स्वप्नभंग, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया महाअंतिम सामन्यात आमनेसामने
South Africa vs Australia Wtc 2025 Final : ऑस्ट्रेलियाने रविवारी 5 जानेवारी रोजी पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवत 3-1 ने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
ऑस्ट्रेलियाने रविवारी 5 जानेवारी रोजी बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने यासह 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी उंचावली. ऑस्ट्रेलियाने यासह टीम इंडियाचा पत्ता कट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023-2025 मध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली. तसेच ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. आता टेस्ट वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा महामुकाबला होणार आहे.
टीम इंडिया याआधीच्या दोन्ही वेळा सलग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचली होती. मात्र टीम इंडियाला दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला आधी न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा पोहचण्यासाठी सिडनीत विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र टीम इंडियाच्या पराभवामुळे ते स्वप्नभंग झालं आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचली.
ऑस्ट्रेलियाआधी दक्षिण आफ्रिकेने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पाकिस्तानला 2 विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी एकमेव विजयाची गरज होती. दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दक्षिण आफ्रिकेची ही डब्ल्यूटीसीच्या इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची पहिली वेळ ठरली. आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये टेस्ट वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगणार आहे.
दोन्ही संघांची तिसऱ्या साखळीतील आतापर्यंतची कामगिरी
डब्ल्यूटीसीच्या या तिसर्या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेने या साखळीत 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 17 पैकी 11 वेळा विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये
Ready to defend their World Test Championship mace 👊
Australia qualify for the #WTC25 Final at Lord’s 🏏
More 👉 https://t.co/EanY9jFouE pic.twitter.com/xcpTrBOsB8
— ICC (@ICC) January 5, 2025
महामुकाबला केव्हा?
दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा महामुकाबला हा 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. टेम्बा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाची धुरा असेल. सद्यस्थितीत दोन्ही कर्णधार सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. अशात अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळेल, यात काहीच शंका नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होणार की दक्षिण आफ्रिका इतिहास घडवणार? या उत्तरासाठी क्रिकेट चाहत्यांना पुढील 6 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.