Boxing Day cricket | बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्ट सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Australia vs India) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळण्यात येणार आहे. ही बॉक्सिंग डे क्रिकेट (Boxing Day cricket) सामना असणार आहे. हा बॉक्सिंग डे क्रिकेट काय प्रकार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बॉक्सिंग डे क्रिकेट ही भानगड नेमकी काय आहे, आणि त्याबद्दल अधिक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. Australia vs India Learn about Boxing Day Test information
सर्व साधारणपणे क्रिकेट विश्वात ख्रिसमसनंतर 26 डिसेंबरला खेळण्यात येणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे क्रिकेट असं म्हटलं जातं. या बॉक्सिंग शब्दामुळे हा सामना बॉक्सिंगशी संबंधित आहे की काय, असंही अनेकांना वाटतं. पण तसं नाहीये. या बॉक्सिंगचा संबंध ख्रिसमस बॉक्सशी आहे. जगातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसनंतरच्या दुसऱ्या दिवसाला (26 डिसेंबर) बॉक्सिंग डे असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक जण नातेवाईक आणि मित्रांना बॉक्स भेट देतात. ही परंपरा गेल्या काही दशकांपासून सुरु आहे. त्यामुळे 26 डिसेंबरला होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे क्रिकेट असं म्हटलं जातं.
बॉक्सिंग डे क्रिकेटचा इतिहास
बॉक्सिंग डे आणि क्रिकेटचा संबंध हा तब्बल 128 वर्षांपासूनचा आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 1892 मध्ये शेफील्ड शील्डचा एक सामना खेळण्यात आला. त्यामुळे व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्समध्ये ख्रिसमसदरम्यान क्रिकेट सामने खेळण्याचा पायंडा पडला. दरम्यान मेलबर्नमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1950 मध्ये खेळण्यात आला होता. हा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला होता. हा सामना 22 डिसेंबरला खेळण्यात आला होता.
मेलबर्नमध्ये 1980 आधी 1952, 1968, 1974 आणि 1975 अशा एकूण 4 कसोटी सामने खेळले गेले. या व्यतिरिक्त 1967, 1972 आणि 1976 मध्ये अॅडिलेड येथे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळण्यात आली. 1975 मध्ये क्लाइव लॉयड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलियाविरोधात बॉक्सिंग डे क्रिकेट सामना खेळला. या सामन्याला तब्बल 85 हजार चाहत्यांची उपस्थिती होती. या सामन्यानंतर 5 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे मॅच खेळवण्याचा सुरुवात केली. बॉक्सिंग डे टेस्ट सामने ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही खेळण्यात येतात.
दुसऱ्या सामन्यात अनेक बदल
पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून अनेक चुका झाल्या. या पराभवामुळे दुसऱ्या सामन्यात अनेक मोठे बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, रिद्धीमान साहा यांच्या जागी शुभमन गिल, रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंत यांना संधी मिळण्याती शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Australia vs India | “विराट आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती टीम इंडियासाठी नुकसानकारक”
Australia vs India 2nd Test | ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूला मिळणार खास मेडल
Australia vs India Learn about Boxing Day Test information