Asia Cup 2023 आणि World Cup साठी हा खेळाडू पुन्हा टीमच्या कर्णधारपदी
World Cup 2023 Captaincy | आशिया कपआधी क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. माजी कर्णधाराची पुन्हा एकदा कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई | क्रिकेट चाहत्यांमध्ये आशिया कप 2023 आणि आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची उत्सूकता पाहायला मिळत आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर वनडे वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे. टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या तोंडावर माजी कर्णधाराला पुन्हा एकदा कॅप्टन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा वनडे टीमचं कर्णधारपद सांभळणार आहे.
बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ऑलराउंडर शाकिब अल हसन याची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी फेरनियुक्ती केली आहे. तमिम इक्बाल याने एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच दुखापतीमुळे तमीनने आशिया कपमधून माघार घेतली. त्यामुळे आता काही दिवसांचा वेळ घेतल्यानंतर अखेर बीसीबीने शाकिबची कर्णधार म्हणून नियुक्ती केलीय. शाकिबला कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. तसेच शाकिब बॅटिंग-बॉलिंग दोन्ही बाजूने दमदार कामगिरी करतो.
शाकिब अल हसन पुन्हा एकदा कर्णधारपदी
Shakib Al Hasan appointed as the new Bangladesh captain for ODIs.
He’ll lead Bangladesh in the Asia Cup and the 2023 World Cup. pic.twitter.com/Km4EUtWjne
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 11, 2023
शाकिबचा कर्णधारपदाचा अनुभव
शाकिब अल हसन याने बांगलादेशचं 52 एकदिवसीय, 19 कसोटी आणि 39 टी 20 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यासं शाकिबला 110 मॅचमध्ये कर्णधारपद सांभाळलं आहे. त्यामुळे आता शाकिब आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन म्हणून कशाप्रकारे जबाबदारी सांभाळतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
शाकिब अल हसन याची क्रिकेट कारकीर्द
शाकिब अल हसन याने आतापर्यंत बांगलादेशचं 235 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. शाकिबने या 235 सामन्यांमधील 222 डावात 82.56 च्या स्ट्राईक रेट आणि 37.36 च्या एव्हरेजने 7 हजार 211 धावा केल्या आहेत. शाकिबने या दरम्यान 9 शतक आणि 53 अर्धशतकं केली आहेत.
दरम्यान आतापर्यंत आशिया कपसाठी बीसीबीने बांगलादेशचा संघ जाहीर केलेला नाही. मात्र याबाबतीत पाकिस्तानने आघाडी घेत 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या 17 सदस्यीय संघाचं कर्णधारपद बाबर आझम करणार आहे. तर उर्वरित संघाची घोषणा केव्हा होणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.