ड्रेसिंग रुममधील सीक्रेट बाहेर कसे आले? बीसीसीआयच्या बैठकीत त्या खेळाडूचं नाव उघड!
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना बरंच काही घडलं होतं. ड्रेसिंग रुममधील बातम्या बाहेर आल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संताप व्यक्त केला होता. आता त्या खेळाडूबाबत थेट बीसीसीआय बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूवर आरोप करण्यात आला आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा दारूण पराभव झाला. या मालिकेदरम्यान टीम इंडियात बरंच काही बिनसल्याचं समोर आलं होतं. बातम्या मीडियात लीक झाल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत रिव्ह्यू मीटिंग बोलवली होती. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित होते. मिडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत गौतम गंभीरने सरफराज खानवर गंभीर आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रेसिंग रुममधील बातम्या लीक केल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. सरफराज खान संघातल्या बातम्या मीडियात शेअर करत असल्याचा ठपका ठेवला आहे. गंभीरने खासकरून इंडियन एक्स्प्रेसमध्ये छापलेल्या बातमीचा उल्लेख केला. यात मेलबर्न कसोटीत पराभवानंतर खेळाडूंवर भडकल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच मिस्टर फिक्स इट नावाने एक बातमी समोर आली होती. मिडिया रिपोर्टनुसार, यात खुलासा केला होता की बुमराहला कर्णधार करण्यासाठी एका खेळाडूचा विरोध होता. हा खेळाडू स्वत: अंतरिम कर्णधार म्हणून ग्राह्य धरत होता. हा खेळाडू विराट कोहली असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. पण गंभीरने त्याच्या दाव्यासाठी पुरावे दिले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरफराज खानने मागच्या वर्षीत टीम इंडियात पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संघात स्थान मिळालं आहे. पण सरफराज खान आणि वाद हे काय पहिल्यांदाच घडलं असं नाही. 13 वर्षांचा असताना त्याच्यावर एका शाळेने खोटं वय सांगितल्याचा आरोप केला होता. तेव्हा त्याच्या हाडांची तपासणी केली गेली आणि बोन एजमध्ये त्याचं वय 15 गणलं गेलं होतं. त्यामुळे खळबळ उडाली होती. पण त्यानंतर एडवान्स्ड तपासणी केल्यानंतर त्याचं वय 13 असल्याचं स्पष्ट झालं. पण या प्रक्रियेत सरफराजने आत्मविश्वास गमावला होता. क्रिकेटमधून ब्रेक घेत मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली होती. असंच एकदा त्याला अनुशासनहीनतेमुळे मुंबईतील प्रशिक्षण शिबिरातूनही बाहेर काढलं होतं.
2015 मध्ये अंडर 19 चॅम्पियनशिप सेमीफायनलमध्ये मुंबईकडून खेळत असताना त्याने असंच काहीसं केलं होतं. यावेळी त्याने सामना जिंकवला होता. पण निवडकर्त्यांच्या दिशेने आक्षेपार्ह हावभाव केले होते. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याने भविष्यात चांगलं वागेल असे आश्वासन दिले होते. इतकंच काय तर त्याची दोन वर्षांची सामना फीही रोखली होती. दुसरीकडे, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रोहित आणि विराट यांच्यातील भांडणाची बातमी लीक झाली होती. यानंतर एक-दोन खेळाडू संघाबाहेर फेकले गेले. आता बीसीसीआय पुन्हा अशी कारवाई करणार का, हा प्रश्न आहे.