अरे हे काय, चक्क Rohit Sharma वरळीच्या रस्त्यावर खेळला गल्ली क्रिकेट, पहा VIDEO
रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना दिसला.
मुंबई: भारतीय संघ (Team India) पुढच्या काही दिवसात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये टीम इंडिया एक कसोटी, तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ 2 ग्रुपमध्ये इंग्लंडला रवाना (England Tour) होणार आहे. पहिला ग्रुप 16 जून आणि दुसरा 19 जूनला रवाना होईल. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) पहिल्या ग्रुपसह 16 जूनला इंग्लंडला रवाना होऊ शकतो. रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना दिसला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. जिथे रोहित वरळीच्या रस्त्यावर स्थानिक मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना दिसतोय.
16 जूनला इंग्लंडला रवाना होणार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चार्टर्ड ऐवजी कमर्शिअल विमानाने लंडनला जाणार आहे. बीसीसीआयने 15 जूनपर्यंत खेळाडूंना मुंबईत एकत्रित होण्यास सांगितलं आहे. दुसरा ग्रुप मुंबईऐवजी बंगळुरुहून रवाना होणार आहे. बंगळुरुमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधला पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. मायदेशात सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित आणि विराट कोहली दोघांना विश्रांती देण्यात आलीय. रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करतोय. सीजन सुरु होण्याआधी केएल राहुलला दुखापत झाली. त्यामुळे नेतृत्व ऋषभ पंतकडे आले.
Rohit Sharma playing gully cricket at woreli, Mumbai. pic.twitter.com/vuHLIVno6D
— Johns. (@CricCrazyJ0hns) June 14, 2022
भारताला जाणवतेय रोहितची कमतरता
पंतच्या नेतृत्वाखाली भारताने आपले सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. टीमला रोहितची कमतरता जाणवतेय. मागच्या दोन सामन्यात पंतच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. भारताने यावर्षी 18 सामने खेळले. रोहितने 11 मॅचमध्ये नेतृत्व केलं. हे सर्वच्या सर्व सामने भारताने जिंकले. पंत आणि राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला एकही सामना जिंकता आला नाही.