IPL 2022 : बटलरकडून कोहलीच्या ‘विराट’ विक्रमाची बरोबरी, एका हंगामात 800हून अधिक धावा, ठरला तिसरा फलंदाज
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत बटलर कोहलीसोबत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने (RR) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) पराभव करून अंतिम फेरी गाठली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत आठ गडी गमावून 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात जोस बटलरच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थानने 3 गडी गमावून 18.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. बटलरने आपल्या खेळीत 10 चौकार आणि सहा षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 176.67 होता. या खेळीसह बटलरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आयपीएलच्या या मोसमातील त्याचे हे चौथे शतक ठरले. त्याने विराट कोहलीच्या एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विशेष म्हणजे बटलरने हा विक्रम कोहलीच्या संघाविरुद्धच केला आहे.
चार शतके झळकावली
कोहलीने 2016 च्या आयपीएलमध्ये चार शतके झळकावली होती. यासह बटलर कोणत्याही टी-20 लीग किंवा मालिकेच्या हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला. या प्रकरणातही त्याने विराटच्या विक्रमाची (चार शतके) बरोबरी केली. दुसऱ्या क्रमांकावर मायकेल क्लिंगर आहे, ज्याने 2015 टी-20 ब्लास्टमध्ये तीन शतके झळकावली होती.
T20 लीगमधील सर्वाधिक शतके
- विराट कोहली: 04 (IPL 2016)
- जोस बटलर: 04 (आयपीएल 2022)
- मायकेल क्लिंगर (T20 ब्लास्ट 2015)
बटलर एका आयपीएल हंगामात 800हून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली आहे. कोहली आणि वॉर्नर या दोघांनी 2016 मध्ये 800 हून अधिक धावा केल्या होत्या.
वॉर्नर आणि कोहलीच्या रेकॉर्डवर नजर
एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या. त्याचवेळी वॉर्नरने 2016 च्या आयपीएलमध्ये 848 धावा केल्या होत्या. बटलरच्या नावावर सध्या 824 धावा आहेत आणि आणखी एक सामना त्याच्या नावावर आहे. अशा परिस्थितीत त्याची नजर वॉर्नर आणि कोहलीच्या रेकॉर्डवर असेल.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा
- 973 धावा: विराट कोहली (2016)
- 848 धावा: डेव्हिड वॉर्नर (2016)
- 824 धावा: जोस बटलर (2022)
- 735 धावा: केन विल्यमसन (2018)
- 733 धावा: ख्रिस गेल (2012)
- 733 धावा: माइक हसी (2013)
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत बटलर कोहलीसोबत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोघांच्या नावावर पाच शतके आहेत. ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. लीगमध्ये त्याची सहा शतके आहेत. केएल राहुल, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याच्या नावावर चार शतके आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके
- ख्रिस गेल: 6
- जॉस बटलर: 5
- विराट कोहली : 5
- केएल राहुल : 4
- डेव्हिड वॉर्नर: 4
- शेन वॉटसन: 4
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा बटलर हा सहावा खेळाडू ठरला. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, वृद्धिमान साहा, मुरली विजय आणि रजत पाटीदार यांनी अशी कामगिरी केली आहे. मागील सामन्यातच पाटीदारने शतक झळकावले होते.