Cheteshwar Pujara : टीम इंडियातून वगळले, 24 तासानंतर चेतेश्वर पुजारा याने 9 सेकंदात काय केलं?; Video व्हायरल
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी संघाची घोषणा झाली आहे. या संघातून चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पुजाराच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, पुजारा निराश झालेला नाही.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा भरवश्याचा फलंदाज म्हणून चेतेश्वर पुजारा भारताच्या टेस्ट टीमचा महत्त्वाचा भाग होता. टीम इंडियाचा सर्व भार त्याच्यावरच असायचा. मात्र, आता पुजारालाच टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, पुजाराला टेस्ट सीरिजमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पुजाराला टीम इंडियात स्थान मिळू शकलेलं नाही, तर या पूर्वीही त्याला संघातून अनेकदा वगळण्यात आलं होतं. पण प्रत्येकवेळी त्याने संघात पुनरागमन केलं होतं. आताही चेतेश्वर पुजारा कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाहीये.
चेतेश्वर पुजाराला गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कसोटी संघातून वगळण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्याचं परत संघात पुनरागमन झालं होतं. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला घेण्यात आलं होतं. यावेळी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चेतेश्वर पुजारा खेळला होता. पण त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस झाला नाही. त्यामुळे त्याचा फटका त्याला बसलेला दिसतोय. त्याला विंडीज विरुद्धच्या दौऱ्यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पुजारा काय करत असेल असा सवाल केला जात आहे.
9 सेकंदाच्या व्हिडिओत काय?
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यात स्थान न मिळाल्याने पुजारा निराश झालेला नाही. संघातून वगळून एक दिवस झाला नाही तोच पुजाराने संघात पुनरागमन करण्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. पुजाराने ट्विटरवर एक 9 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो फलंदाजीचा अभ्यास करताना दिसत आहे. विशेष म्हणजे नेटमध्ये नव्हे तर तो मोकळ्या मैदानात कसून सराव करताना दिसत आहे. यावरून संघातून वगळलं तरी हार मानत नाही, पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी तयारी करत असतो हेच त्याने दाखवून दिलं आहे.
या संघात खेळणार
कसोटी संघातून वगळल्यानंतर पुजारा आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार, पुजारा दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोनकडून खेळण्याची शक्यता आहे. पुजाराने 24 जून रोजी 4 वाजून 4 मिनिटाने केलं आहे. विशेष म्हणजे जवळपास त्याचवेळी 23 जून रोजी टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा झाली होती. वनडे आणि कसोटी संघ जाहीर करण्यात आला होता. त्यातून पुजाराला वगळण्यात आलं होतं.
? ❤️ pic.twitter.com/TubsOu3Fah
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) June 24, 2023
तरुणांना संधी द्यायची होती, म्हणून…
मिळालेल्या माहितीनुसार, कोच राहुल द्रविड आणि निवड समितीला विंडीज दौऱ्यात तरुणांना संधी द्यायची होती. त्यामुळेच यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात स्थान मिळालं आहे. परिणामी पुजाराला संघाबाहेर राहावं लागलं आहे. मात्र, पुजारासाठी संघाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. त्याने देशांतर्गत क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी केल्यास त्याचं संघात पुनरागमन होऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.