CSK MS Dhoni IPL 2022: एमएस धोनी चित्रपट बनवणार, प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिरॉईन
CSK MS Dhoni IPL 2022: धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन बनला आहे. आजही तो संघाच्या गरजेनुसार खेळतो. फिनिशरचा रोल उत्तमरित्या वठवतो. प्रतिस्पर्धी संघांसाठी आजही महेंद्रसिंह धोनी एक आव्हान आहे.
मुंबई: क्रिकेटच्या मैदानात छाप उमटवल्यानंतर एमएस धोनी (MS dhoni) आता सिने क्षेत्रात प्रवेश करणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलीय. पण फ्रेंचायजी क्रिकेट (franchise Cricket) तो अजून खेळतोय. यंदाचा इंडियन प्रीमियर लीगचा त्याचा शेवटचा सीजन असू शकतो. हा सीजन सुरु होण्याआधी धोनीच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पण धोनीने आपल्या बॅटनेच टीकाकारांची तोंड बंद केली. धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन बनला आहे. आजही तो संघाच्या गरजेनुसार खेळतो. फिनिशरचा रोल उत्तमरित्या वठवतो. प्रतिस्पर्धी संघांसाठी आजही महेंद्रसिंह धोनी एक आव्हान आहे. खेळाची त्याला उत्तम समज आहे. हाच धोनी क्रिकेटच्या पीचवर ठसा उमटवल्यानंतर सिने क्षेत्रात प्रवेश करतोय. याआधी सुद्धा अनेक क्रिकेटपटूंनी दुसरी इनिंग म्हणून सिनेमात आपलं नशीब आजमावून पाहिलय. पण धोनीचा रोल थोडा वेगळा आहे.
नयनतारा बरोबर हातमिळवणी
महेंद्रसिंह धोनी लवकरच एका तामिळ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. धोनीने एका तामिळ प्रोजेक्टची निवड केल्याची माहिती आहे. क्रिकेट आणि चेन्नई सुपर किंग्समुळे एमएस धोनीची तामिळनाडूत मोठी लोकप्रियता आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. धोनीने दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा बरोबर हातमिळवणी केलीय. धोनीच्या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसू शकते. स्पोर्ट्स टायगरने हे वृत्त दिलं आहे. चेन्नईला चार वेळा आय़पीएलचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी आता कॉलीवूडमध्ये नशीब आजमवतोय.
चित्रपट अनेक क्रिकेटपटुंची दुसरी इनिंग
मे महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. तामिळ चित्रपटांमध्ये नशीब आजमवणार धोनी पहिला क्रिकेटपटू नाहीय. धोनीच्या आधी हरजभज सिंगने सुद्धा ‘डिक्कीलूना’ मध्ये काम केलं होतं. क्रिकेट करीयर संपल्यानंतर भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी दुसरी इनिंग म्हणून चित्रपटात काम करुन पाहिलय. पण कोणीच स्वत:ला स्थापित करु शकल नाही. धोनी त्याच्या तामिळ चित्रपटात काम करणार की, नाही हे माहित नाही. पण तो चित्रपटाची निर्मिती करतोय.
काही अंतर्गत वाद, कुरबुरी
यंदाचा सीजन चेन्नई सुपर किंग्ससाठी खास राहिलेला नाही. सुरुवातीचे सामने गमावल्यामुळे चेन्नईची प्लेऑफमध्ये दाखल होण्याची शक्यता खूपच धुसर आहे. सीजन सुरु होण्याच्या दोन दिवस आधी रवींद्र जाडेजाला कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पण टीमच्या खराब प्रदर्शनामुळे त्याने आठ मॅचनंतर कॅप्टनशिप सोडली. आता धोनी कॅप्टन आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम चांगली खेळतेय. पण काही अंतर्गत वाद, कुरबुरी सुद्धा समोर आल्या आहेत.