Cricket : सुरेश रैना इज बॅक, महेंद्र सिंग धोनीचा हुकमी एक्का पुन्हा एकदा उतरतोय मैदानात!
महेंद्र सिंग धोनीचा हुकमी एक्का असलेल्या रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखलं जातं. सुरेश परत एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना परत एकदा मैदानात उतरणार आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. सीएसके संघाने पाचवेळा ट्रॉफीवर नाव कोरलं असून त्यामध्ये रैनानेही संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. महेंद्र सिंग धोनीचा हुकमी एक्का असलेल्या रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखलं जातं. सुरेश परत एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
36 वर्षीय सुरेश रैनाने सप्टेंबर 2022 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, डिसेंबर 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या अबू धाबी T10 स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळताना त्याने 3 सामन्यात एकूण 36 धावा केल्या. आता आगामी लंका प्रीमियर लीग (LPL) 2023 साठी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होणार आहे.
लंका प्रीमियर लीगमधील खेळाडूंचा लिलाव 14 जून रोजी होणार आहे. आणि आगामी स्पर्धा 30 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या लिलावामध्ये रैनाने आपली 50,000 यूएस डॉलर इतकी बेस प्राईज ठेवली आहे. रैनाला परत एकदा मैदानात खेळताना पाहायला मिळणार असल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
लंका प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वात आयपीएलप्रमाणे खेळाडूाची लिलाव होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितल्यानुसार यंदा लिलावात 500 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये जवळपास 140 परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसह अनेक बड्या स्टार खेळाडू दिसतील.
दरम्यान, आयपीएलमध्ये रैनाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 32.51 च्या सरासरीने आणि 136.76 च्या स्ट्राइक रेटने 5,528 धावा केल्या आहेत. रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 39 अर्धशतक आणि 1 शतक आहे.