Sanju Samson चं वेगवान शतक, इंडिया-बांगलादेश कसोटी दरम्यान धमाकेदार खेळी
Sanju Samson Century : संजू सॅमसन याने दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत शतकी खेळी केली आहे. संजूने यासह बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी दावा ठोकला आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या फेरीतील सामने खेळवण्यात येत आहेत. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या सामन्यात इंडिया बी विरुद्ध इंडिया डी आमनेसामने आहेत. संजू सॅमसनने या सामन्यातील पहिल्या डावात इंडिया बी विरुद्ध झंझावाती शतकी खेळी केली आहे. संजूने अवघ्या 94 बॉलमध्ये शेकडा पूर्ण केला. संजू यासह या मोसमात सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला. संजूने तब्बल 1 हजार 740 दिवसांनी म्हणजेच 4 वर्ष 9 महिन्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतक ठोकलं.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील उभयसंघातील हा सामना अनंतपूर येथे खेळवण्यात येत आहे. श्रेयस अय्यर इंडिया डी संघाचं नेतृत्व करतोय. संजू सॅमनन सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. संजूने पहिल्या दिवसाचा (19 सप्टेंबर) खेळ संपेपर्यंत नाबाद 89 धावा केल्या. संजूने दुसऱ्या दिवशी 94 चेंडूत 11 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 11 वं शतक पूर्ण केलं. संजूने अखेरीस 2019 साली बंगालविरुद्ध 116 धावांची खेळी केली होती. संजूने रणजी ट्रॉफी स्पर्धेत हे शतक केलं होतं.
संजूला शतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र संजूला शतकानंतर फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. संजूने 101 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. संजूच्या या शतकी खेळीमुळे इंडिया डी ला 300 पार मजल मारता आली. इंडिया डी चा डाव 87.3 ओव्हरमध्ये 349 धावांवर आटोपला. तर इंडिया बीकडून नवदीप सैनी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
संजूचा शतकी धमाका
– 11 Hundreds in First Class. – 3 Hundreds in List A. – 3 Hundreds in T20s.
SANJU SAMSON SHOW AT DULEEP TROPHY 🥶 pic.twitter.com/gaB8G01NeX
— Johns. (@CricCrazyJohns) September 20, 2024
इंडिया बी प्लेइंग 11 : अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), एन जगदीसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मुशीर खान, सुयश प्रभुदेसाई, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, राहुल चहर, नवदीप सैनी, मोहित अवस्थी आणि मुकेश कुमार.
इंडिया डी प्लेइंग 11 : श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, निशांत सिंधू आणि आकाश सेनगुप्ता.