Fact Check : विराट कोहलीचा चौकार दक्षिण अफ्रिकेच्या वर्ल्डकप पराभवाचं कारण ठरलं! फिल्डिंगवेळी झालं असं काही
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचं जेतेपद टीम इंडियाने मिळवलं. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या थराराने धाकधूक वाढली होती. पण हार्दिकी पांड्याच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने झेल घेतला आणि सामना फिरला. पण आता या विजयाचं श्रेय विराटच्या चौकारला दिलं जात आहे. सोशल मीडियावर नेमकी काय चर्चा रंगली आहे ते जाणून घेऊयात

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं आणि जेतेपद मिळवलं. शेवटच्या षटक सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली होती. 6 चेंडूत 16 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला गेला. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डेविड मिलरने उत्तुंग षटकार मारला. चेंडू हवेत उंच उडाल्याने धाकधूक वाढली होती. कारण मिलरने हा षटकारच मारला असा तेव्हाचा फील होता. मात्र त्या चेंडूखाली बरोबर सूर्यकुमार आला आणि अप्रतिम झेल घेतला. षटकार जाणारा चेंडू आत ढकलला आणि पुन्हा सीमारेषेच्या आत उत्कृष्ट झेल घेतला. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला आणि सरतेशेवटी 7 धावांनी विजय मिळवण्यात यश आलं. मात्र सूर्यकुमारच्या या झेलचं श्रेय विराट कोहलीच्या चौकाराला दिलं जात आहे. याबाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकापासून रोहित आणि विराटने आक्रमक सुरुवात केली. जानसेन टाकत असलेल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने स्ट्रेट ड्राईव्ह मारला.
चौकार अडवण्यासाठी एडन मार्करम धावला आणि सीमेरेषेजवळ डाइव्ह मारत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. पण चौकार काही अडवता आला नाही. मात्र यामुळे एक गोष्ट झाली ती म्हणजे रोप पुढे सरकला. त्याचा फायदा सूर्यकुमार यादवला शेवटच्या षटकात झेल पकडताना झाला अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पण काही जणांचं म्हणणं असं आहे की, डेविड मिलरने जो फटका मारला तो दुसऱ्या बाजूला होता. त्यामुळे त्याचा याचाशी काही एक संबंध नाही. आता यात कितपत तथ्य आहे ते काही सांगता येत नाही. पण सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला आणि सामना जिंकून देण्यास मदत केली हेच अंतिम सत्य आहे.
So that catch was possible bcz of Virat Kohli#ViratKohli #T20WorldCup #INDvSA pic.twitter.com/Y6xAClE9Wv
— Sayyed Makashif Quadri (@SMakashif93) July 9, 2024
टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जेतेपदावर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. यापूर्वी 2007 साली टीम इंडियाने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 17 वर्षे या जेतेपदापासून वंचित होते. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने एकही सामना न गमवता जेतेपदावर नावर कोरलं. तसेच 11 वर्षांपासून सुरु असलेला आयसीसी चषकांचा दुष्काळही दूर केला. आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सज्ज आहे.