मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी पंजाब किंग्सच्या प्लेऑफच्या अपेक्षांना झटका दिला. धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबला 15 धावांनी हरवलं. दिल्ली कॅपिटल्सची टीम आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. दिल्लीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 213 धावा केल्या. पंजाब किंग्सने 8 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक (96) धावा केल्या.
या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन शुन्यावर बाद झाला. अर्थव तायडेने (55) धावा करुन पंजाब किंग्सच्या इनिंगला स्थैर्य दिलं. अर्थव तायडेने चांगली सुरुवात केली. पण आवश्यक धावगती सतत वाढत होती. 23 वर्षाचा युवा अर्थव सतत चौकार मारण्यासाठी संघर्ष करताना दिसत होता.
म्हणून पंजाबने केलं रिटायर्ड आऊट
त्यामुळे पंजाबच्य टीम मॅनेजमेंट 15 व्या ओव्हरमध्ये अर्थवला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याजागी पावरहिटर जितेश शर्माला पाठवण्यात आलं. अर्थव ड्रेसिंग रुममध्ये येत असताना, पंजाब टीमच्या सदस्यांनी त्याचं कौतुक केलं. वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयन बिशपने अर्थव तायडे जी इनिंग खेळला, त्या बद्दल त्याचं कौतुक केलं. अर्थव रिटाय़र्ड आऊट झाला, त्यातून त्याला शिकण्यासारख बरच काही आहे, असं बिशप म्हणाले.
‘तो त्याच्या खेळातून शिकेल’
“तायडे तरुण आहे. तो काही सामन्यात खेळला, काही मॅच बाहेर होता. अर्थव नेहल वढेरासारखाच आहे. यातून तो शिकेल. अजून चांगला प्लेयर म्हणून तयार होईल. कोणीही त्याच्याबरोबर कठोरपणे वागू नये. तो त्याच्या खेळातून शिकेल” असं इयन बिशप म्हणाले.
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नेहल वढेराला मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 20 चेंडूत 16 धावांवर तो आऊट झाला. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची टीम 5 धावांनी हरली, नेहलने या सीजनमध्ये चांगला खेळ दाखवलाय. त्याच्यामध्ये पावर हिटिंगची क्षमता आहे.