रिकी पोटिंग, ना लँगर, ना फ्लेमिंग, विदेशी खेळाडू टीम इंडियाच्या कोचच्या रेसमधून बाहेर… गौतम गंभीरसह ही नावे आघाडीवर
Team India Head Coach Update: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनायचे असेल तर गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षकपद सोडावे लागणार आहे. कारण बीसीसीआयच्या नियमांमध्ये आणि घटनेत एक व्यक्ती दोन लाभाची पदे घेऊ शकत नाही.
Team India Head Coach Update: रिकी पोटिंग, जस्टिन लँगर, एंडी फ्लॉवर या खेळाडूंनी टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्यास नकार दिला. तसेच स्टीफन फ्लेमिंगसंदर्भात चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी मोठा दावा केला आहे. स्टीफन फ्लेमिंग हे पद सांभाळू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट टीमचे हेड कोच राहुल द्रविड यांची जागा कोण घेणार? हा प्रश्न आता चर्चेत आहे. विदेशी खेळाडू टीम इंडियाच्या कोचच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यावर देशातील कोणता खेळाडू ही भूमिका सांभाळणार का? हा प्रश्न समोर आला आहे. त्यासाठी गौतम गंभीर याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. दरम्यान जय शाह यांनी आपण किंवा बीसीसीआयने कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूशी टीम इंडियाच्या कोचसाठी संपर्क केला नाही, असे म्हटले आहे.
27 मे पर्यंत हे अर्ज मागवले
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) 13 मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले. 27 मे पर्यंत हे अर्ज मागवण्यात आले आहे. आता प्रशिक्षकाच्या स्पर्धेत गौतम गंभीर याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या गौतम गंभीरचे नाव पुढे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयनेच गौतम गंभीरशी संपर्क साधून त्याला प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र, गौतम गंभीरने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
गंभीरचा दावा मजबूत का?
गौतम गंभीर याने स्पेशालिस्ट प्रशिक्षक म्हणून काम केले नाही. पण आयपीएल संघांसोबत मार्गदर्शक म्हणून त्याचे काम उल्लेखनीय झाले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने चमकदार कामगिरी करत आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे. केकेआर मार्गदर्शक होण्यापूर्वी गंभीरने लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघात हीच जबाबदारी पार पाडली होती. जोपर्यंत तो LSG मध्ये राहिला तोपर्यंत 2022 आणि 2023 या दोन्ही वेळा संघाने प्लेऑफ सामन्यांमध्ये प्रवेश केला. म्हणजेच गंभीर ज्या ज्या संघात आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणून काम केले, त्यांची कामगिरी चांगली झाली.
"Neither I nor BCCI approached any ex-Australian cricketer with coaching offer": Jay Shah
Read @ANI Story | https://t.co/AgRRsJaNfv#JayShah #TeamIndia #BCCI pic.twitter.com/h9A9j7lVf3
— ANI Digital (@ani_digital) May 24, 2024
इतर कोण आहेत स्पर्धेत
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गौतम गंभीर याच्यानंतर हरभजन सिंग याचे नावही पुढे आले आहे. परंतु आपण या पदासाठी अर्ज करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गंभीरशिवाय वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचाही विचार केला जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनायचे असेल तर गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षकपद सोडावे लागणार आहे. कारण बीसीसीआयच्या नियमांमध्ये आणि घटनेत एक व्यक्ती दोन लाभाची पदे घेऊ शकत नाही.