Cricket : ‘डेव्हिड वॉर्नरला मिळाली त्याच्या कृत्याची शिक्षा, आता खुशाल बनवा कर्णधार’, ऑस्ट्रेलियातील दिग्गज खेळाडूंची मागणी
Cricket : डेव्हिड वॉर्नरला का मिळत आहे दिग्गज खेळाडूंचा भरभरुन पाठिंबा?..
नवी दिल्ली : ‘वो तो है अलबेला,हजारों में अकेला सदा तुमने एब देखा हुनर को न देखा’, हे गाणं तुम्हाला आठवतं का? ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सामनावीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा तो अलबेला आहे. कांगारू टीमच्या स्फोटक खेळाडूंमधील हा मुकूटमणी. पण हा क्रिकेटचा नायक ऑस्ट्रेलियन टीमचा (Australian Cricket Team) कधीच कर्णधार होऊ शकला नाही. कारण त्याच्या कर्णधारपदाच्या वाटेत त्यानेच काटे पेरले आहे. त्याच्या एका कृत्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) या सर्वोच्च संघटनेने प्रतिबंध घातला आहे. हा प्रतिबंध आजीवन काळासाठी असल्याने त्याचे कर्णधारपदाचं स्वप्न अधूरं राहिले आहे.
पण त्याचा हा वनवास संपण्याची चिन्हं आहेत. कारण डेव्हिडने जे केले, त्याची त्याला शिक्षा मिळाली आहे, त्यामुळे आता जास्त न ताणता, त्याची कर्णधारपदी वर्णी लावण्याची मागणी ऑस्ट्रेलियन टीमच्या दिग्गज खेळाडूंनी लावून धरली आहे.
वॉर्नर हा सामना जिंकणारा हुकमी एक्का आहे. पण तो कधीच ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार होऊ शकत नाही. त्याच्यावर 2018 साली प्रतिबंध घालण्यात आला होता. अर्थात त्यासाठी तोच जबाबदार होता. ही घटना ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतावरचा कलंक म्हणून ओळखल्या जाते.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात त्याचे सँड पेपर कांड जगभरात गाजले होते. चेंडू कुरतडल्या प्रकरणात (Ball Tempering) हा पठ्ठ्या अलगद सापडला. त्याला तात्काळ एका वर्षासाठी निलंबितही करण्यात आले. आता या घटनेला तीन वर्षांहून अधिक काळ लोटून गेला.
संघात परतल्यानंतर त्याची मैदानावरची आणि मैदानाबाहेरची कामगिरी उत्तम आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कर्णधार हवा आहे आणि त्यासाठी डेव्हिड एकदम फीट बसतो. पण त्याचा इतिहास काही त्याचा पिच्छा सोडताना दिसत नाही.
दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी महान वेगवान गोलदांज ग्लेन मॅक्ग्रा (Glen McGrath) हा डेव्हिडच्या मदतीला धाऊन आला आहे. वॉर्नरला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. त्यासाठी त्याला किंमतही मोजावी लागली आहे. आता त्याला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करु द्यावे, अशी वकिली मॅक्ग्राने केली आहे.
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ, वॉर्नर आणि कॅमरुन बेनक्राफ्ट या तिघांचा दक्षिण आफ्रिकेतील चेंडू कुरतल्याप्रकरणात सहभाग होता. त्यानंतर तिघांनाही एका वर्षासाठी सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यातून खेळण्यास मनाई करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने केलेल्या बदलाचा आता वॉर्नरला फायदा होऊ शकतो. क्रिकेट संघाच्या आचार संहितेत काही बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वॉर्नरला त्याच्या शिक्षेविरोधात अपिल दाखल करता येईल.
‘सँड पेपर कांड हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात कायम कलंक राहिल, परंतु, प्रत्येकाला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे वॉर्नरला कर्णधार पद हवे असेल तर, त्याला माझ्या शुभेच्छा’, असा संदेश वेगवान गोलंदाज मॅक्ग्रॉने दिल्या आहेत.