Andrew Symonds Death: ‘खूप लवकर गेला’, अँड्र्यू सायमंड्सच्या अकाली निधनाने हरभजन सिंग दु:खी
Andrew Symonds Death: सामन्यादरम्यान हरभजन आणि सायमंड्स मध्ये वादावादी झाली होती. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने सामनाधिकाऱ्यांकडे हरभजन विरोधात तक्रार केली होती.
मुंबई: शेन वॉर्न (Shane warne) पाठोपाठ क्रिकेट विश्वाने आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूला गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं (Andrew symonds) काल रात्री कार अपघातात (Car Accident) निधन झालं. क्वीन्सलँड राज्यातील टाउन्सविले येथे त्याच्या कारला अपघात झाला. सायमंड्स 46 वर्षांचा होता. सायमंड्सच्या गाडीने रस्ता सोडल्यामुळे हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. डॉक्टर्सनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण अपघातात त्याला बराच मार लागला होता. रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सायमंड्सच्या अकालीन निधानाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक माजी क्रिकेटपटू या दिग्गजाला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सुद्धा सायमंड्सच्या निधनावर टि्वट केलं आहे. सायमंड्सच्या अकाली निधनाचा हरभजन सिंगला सुद्धा धक्का बसला आहे.
दिवंगत आत्म्यासाठी माझी प्रार्थना
“अँड्र्यू सायमंड्सच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. खूप लवकर गेला. मित्र परिवार आणि त्याच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. दिवंगत आत्म्यासाठी माझी प्रार्थना” असं हरभजनने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Shocked to hear about the sudden demise of Andrew Symonds. Gone too soon. Heartfelt condolences to the family and friends. Prayers for the departed soul ?#RIPSymonds
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 15, 2022
हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्समधील शत्रुत्व सगळ्यांना ठाऊक आहे. 2007-08 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मंकी गेटचा वाद झाला होता. हा वाद बराच गाजला होता. आजही क्रिकेटचे जाणकार हा वाद विसरलेले नाहीत. वर्णद्वेषापर्यंत आरोप झाले होते.
काय होतं हे मंकी गेट प्रकरण?
2007-08 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. सिडनीत सीरीजमधील दुसरा कसोटी सामना सुरु होता. यजमान संघाने म्हणजे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला होता. सामन्यादरम्यान हरभजन आणि सायमंड्स मध्ये वादावादी झाली होती. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने सामनाधिकाऱ्यांकडे हरभजन विरोधात तक्रार केली होती. हरभजनने वर्णद्वेशी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. हरभजनने सायमंड्सला माकड म्हटल्याचं पॉन्टिंगने आरोप केला होता.
या प्रकरणाच्या सुनावणी नंतर हरभजन सिंगवर काही सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी भारतीय संघासह BCCI भक्कमपणे हरभजनच्या पाठिशी उभे राहिले. भारताने दौरा रद्द करण्याचीही धमकी दिली होती. अखेरीस हरभजनवरील बंदी हटवण्यात आली व मॅच फी चा दंड ठोठावण्यात आला.