‘Hardik pandya पुढच्यावर्षी निवृत्ती स्वीकारु शकतो’, असं घडू शकतं, कारण…
हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) करीयर मधला सध्या उत्तम काळ सुरु आहे. मागच्या दोन-तीन महिन्यात त्याने शानदार प्रदर्श केलय.
मुंबई: हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) करीयर मधला सध्या उत्तम काळ सुरु आहे. मागच्या दोन-तीन महिन्यात त्याने शानदार प्रदर्शन केलय. या भारतीय ऑलराऊंडरने मैदानावर फक्त जोरदार पुनरागमनच केलं नाही, तर आयपीएल (IPL) मध्ये एका संघाची कॅप्टनशिप संभाळली व पहिल्याच प्रयत्नात संघाला विजेतेपद मिळवून दिलं. भारतीय क्रिकेट संघात (Team India) पुन्हा निवड झाल्यानंतर त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. तिथेही त्याने आपले नेतृत्व गुण दाखवू दिले. त्याच्याकडे भविष्यातील टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहिलं जातय. एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना, कोणी म्हटलं, हार्दिक पंड्या पुढच्या एक वर्षात निवृत्ती स्वीकारेल, तर नक्कीच धक्का बसेल. टीम इंडियाचे माजी हेड रवी शास्त्री यांच्यामते असं घडू शकतं.
ODI मधून हार्दिक निवृत्त होणार
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसऱ्या वनडेसाठी कॉमेंट्री करत असताना, माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी हा दावा केला. स्काय स्पोर्ट्सकडून कॉमेंट्री करताना ODI फॉर्मेटच्या भविष्यावर चर्चा सुरु असताना, रवी शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हार्दिक 2023 वर्ल्ड कप नंतर वनडे क्रिकेट मधून सन्यास घेऊ शकतो, असं शास्त्री म्हणाले. तुमच्यासमोर असे खेळाडू आहेत, ज्यांनी आधीच ठरवलय, त्यांना कुठल्या फॉर्मेट मध्ये खेळायचय. हार्दिक पंड्याच उदहारण घ्या. त्याला टी 20 क्रिकेट खेळायचय. अजून कुठल्या फॉर्मेट मध्ये खेळायचं नाही, हे त्याच्या डोक्यात स्पष्ट आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्री काय म्हणाले?
“भारतात पुढच्यावर्षी वर्ल्ड कप स्पर्धा आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या 50 ओव्हर्सच क्रिकेट खेळणार. पण त्यानंतर तुम्हाला वेगळं चित्र दिसू शकतं. तुम्हाला अन्य खेळाडूंच्या बाबतीतही असं होताना दिसू शकतं. ते फॉर्मेट निवडायला सुरुवात करु शकतात. त्यांना तसा पूर्ण अधिकार आहे” असं शास्त्री म्हणाले.
हार्दिकने केलं होतं पुनरागमन
मागच्या 3-4 वर्षात हार्दिक पंड्या दुखापतीमुळे फार क्रिकेट खेळलेला नाही. 2018 साली तो तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळत होता. त्यानंतर तो फक्त वनडे आणि टी 20 मध्ये खेळतोय. मागच्या काही महिन्यात तो टी 20 क्रिकेट जास्त खेळलाय. माझं सर्व लक्ष टी 20 वर्ल्ड कप वर असल्याचं हार्दिकने आधीच स्पष्ट केलय.