Wtc Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख जाहीर, आयसीसीकडून घोषणा
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याआधी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नागपुरात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी 40 हजारांपेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसह, क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने अर्थात आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
क्रिकेट विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या तारखेबाबत एकच चर्चा सुरु होती. अखेर आता आयसीसीने तारीख जाहीर केली आहे. तसेच या महत्त्वाच्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवसही ठेवला आहे. त्यामुळे आता तारखांच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.
दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल मॅचही आजपासून बरोबर 4 महिन्यांनी होणार आहे. फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.
सामन्याचं आयोजन कोणत्या स्टेडियममध्ये?
आयसीसीला यंदाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅचचं आयोजन लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडमध्ये करण्यात अपयश आलं आहे. दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल
Mark your calendars ?
The dates for the ICC World Test Championship Final later this year have been revealed ?#WTC23https://t.co/gOJcoWVc58
— ICC (@ICC) February 8, 2023
न्यूझीलंड पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरली होती. न्यूझीलंडने टीम इंडियाचा जून 2021 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पराभव केला होता. हा सामना साउथम्पटनमध्ये खेळवण्यात आला होता. मात्र यावेळेस न्यूझीलंड फायनलच्या शर्यतीत आसपासही नाही. मात्र टीम इंडियाकडे दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे.
अंजिक्यपदासाठी अंतिम सामन्यात आमनेसामने कोण?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या पहिल्या 2 संघात अंतिम सामना रंगणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. तर त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतरच दोन्ही फायनल टीम ठरतील.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.