बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, सहा खेळाडूंनी दाखवली धमक
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी संघ जाहीर केला आहे. असं असताना आयसीसीची क्रमवारी पाहून बांग्लादेश संघाला घाम फुटला आहे. कारण टीम इंडियातील संघातील सहा खेळाडूंची टॉप 10 मध्ये वर्णी लागली आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली तर पुढचं गणित सोपं होणार आहे. अन्यथा खूपच किचकट समीकरणाला सामोरं जावं लागेल. बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 ने धुव्वा उडवला असल्याने आत्मविश्वास दुणावलेला आहे. असं असूनही आयसीसीच्या क्रमवारीने बांगलादेशला घाम फुटला आहे. कारण भारताचे सहा खेळाडू आयसीसी क्रमवारीतील टॉप टेनमद्ये आहेत. तीन खेळाडू फलंदाजांच्या यादीत आणि तीन खेळाडू गोलंदाजीच्या यादीत आहेत. त्यामुळे भारताविरूद्धचा लढा पाकिस्तान इतका सोपा नाही. कारण या सहा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तर सर्वकाही कठीण होणार आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या, डॅरिल मिशेल तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वाल सहाव्या आणि विराट कोहली सातव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तर गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या आणि रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे.
कसोटीतील टॉप 10 फलंदाज
- जो रूट (इंग्लंड)- 899 रेटिंग
- केन विल्यमसन (न्यूझीलंड)- 859 रेटिंग
- डॅरिल मिशेल (न्यूझीलंड)- 768 रेटिंग
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- 757 रेटिंग
- रोहित शर्मा (भारत)- 751 रेटिंग
- यशस्वी जयस्वाल (भारत)- 740 रेटिंग
- विराट कोहली (भारत)- 737 रेटिंग
- उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)- 728 रेटिंग
- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- 720 रेटिंग
- मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया)- 720 रेटिंग
कसोटीतील टॉप 10 गोलंदाज
- आर. अश्विन (भारत)- 870 रेटिंग
- जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) – 847 रेटिंग
- जसप्रीत बुमराह (भारत)- 847 रेटिंग
- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)- 820 रेटिंग
- कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)- 834 रेटिंग
- नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)- 801 रेटिंग
- रवींद्र जडेजा (भारत)- 788 रेटिंग
- काइल जेमिसन (न्यूझीलंड)- 729 रेटिंग
- मॅट हेन्री (न्यूझीलंड)- 711 रेटिंग
- शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)- 709 रेटिंग