Jasprit bumrah: ‘तरी मी जसप्रीत बुमराहला निवडणार नाही’, भारतीय गोलंदाजाच मोठं वक्तव्य
सध्या जसप्रीत बुमराहची (Jasprit bumrah) सर्वत्र चर्चा सुरु आहे. कारण बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने दबदबा निर्माण केलाय. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड असो वा दक्षिण आफ्रिका जसप्रीत बुमराह परदेशातील सर्वच खेळपट्टयांवर एक घातक गोलंदाज आहे.
नवी दिल्ली: सध्या जसप्रीत बुमराहची (Jasprit bumrah) सर्वत्र चर्चा सुरु आहे. कारण बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने दबदबा निर्माण केलाय. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड असो वा दक्षिण आफ्रिका जसप्रीत बुमराह परदेशातील सर्वच खेळपट्टयांवर एक घातक गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहने काल पाच विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेच कंबरड मोडलं. यावर क्रिकेट क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला (Asish Nehra) जसप्रीत बुमरहाने इम्प्रेस केलय. पण नेहराच्या मते बुमराहच्या तोडीचे काही अन्य गोलंदाजही आहेत.
‘तो’ ही बुमराह सारखीच गोलंदाजी करतोय
नेहराच्या मते जसप्रीत बुमराह इतकीच मोहम्मद शमीनेही चांगली कामगिरी केलीय. “जसप्रीत बुमराहने मला प्रभावित केले, यात अजिबात शंका नाही. पण जागतिक क्रिकेटमध्ये आज त्याच तोडीचे दुसरेही चांगले गोलंदाज आहेत. यापैकीच एक आहे मोहम्मद शमी. मला आकडे माहित नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे, दोघांमध्ये तुम्ही एक गोलंदाज निवडायला सांगाल, तर मी डोळे बंद करुन तो बुमराहचे असेल असं म्हणणार नाही” असं आशिष नेहराने सांगितलं.
“तुम्ही पाच विकेटस बाजूला ठेवल्या, तर शमीने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, ती खरोखरच अप्रतिम गोलंदाजी होती. कुठल्याही खेळपट्टीवर सेट झालेल्या फलंदाजाला आऊट करण्याची शमीची क्षमता आहे. तो कुठल्याही अंगाने बुमराहपेक्षा मागे नाही” असं आशिष नेहराने म्हटलं आहे.