Virat Kohli | ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकत ‘विराट’ कारनामा, कोहलीकडून दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी
टीम इंडियाचा आक्रमक आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकत मोठा कारनामा केला आहे. जाणून घ्या...
अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन विराट कोहली याने या चौथ्या दिवशी शतक ठोकलं. विराटला हे शतक करण्यासाठी 241 चेंडूचा सामना करावा लागला. विराटचं हे कसोटी कारकीर्दीतील 28 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वं शतक ठरलं. तसेच विराटचं हे मायदेशातील 35 वं शतक आहे. विराटला या शतकासाठी जवळपास 3 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. मात्र विराटने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी सेंच्युरी केली. विराटच्या या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आघाडीच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. तर टीम इंडिया आता 400 पार गेली आहे.
विराटने सेंच्युरी ठोकत टीम इंडियाच्या माजी कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने लिटील मास्टर सुनीर गावसकर याच्या रेकॉर्डची लेव्हल केलीय. विराटचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं 8 वं शतक ठरलंय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक ठोकण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर त्या खालोखाल आता सुनील गावसकर आणि विराट कोहली 8 शतकांसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक असणारा विराट हा पहिला सक्रिय भारतीय आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या.
कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.